नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेने केलेल्या जबरदस्त शुल्कवाढीनंतर भारतीय निर्यातदारांना आफ्रिकेतील बाजारपेठ खुणावत आहे. इतकेच नव्हे तर आफ्रिकेतील आपल्या उपकंपन्यांमार्फत अमेरिकेत निर्यातीसाठी भारतातील कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
अमेरिकेने 27 ऑगस्टपासून रशियन तेलाच्या खरेदीसाठी भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लागू केले आहे. त्यामुळे भारतीय मालावर अमेरिकेत 50 टक्के शुल्क लागू करण्यास सुरुवात झाली आहे. या जबर शुल्क वाढीमुळे भारतीय मालाची स्पर्धात्मकता संपणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कापड आणि ज्वेलरी उद्योगाने आफ्रिकेची वाट धरली आहे. गोकलदार एक्स्पोर्टस् लिमिटेड आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रेमंड लाईफस्टाईलने अमेरिकन शुल्क वाढीतून दिलासा मिळवण्यासाठी काही आफ्रिकन देशांची वाट धरली आहे. याशिवाय डायमंड अँड ज्वेलरी एक्स्पोर्टस्नेही व्यवसाय विस्तारासाठी आफ्रिकेची निवड केली आहे.
अमेरिकन शुल्कवाढीचा फटका कामगारांची अधिक संख्या असलेल्या कापड आणि ज्वेलरी उद्योगाला बसणार आहे. अमेरिकेत 2023 मध्ये 20 अब्ज डॉलर किमतीचे कापड आणि ज्वेलरी निर्यात करण्यात आली आहे. गोकलदास एक्स्पोर्टस्चे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन गणपती म्हणाले, अमेरिकेची 50 टक्के शुल्कवाढ कायम राहिली. केनिया आणि इथिओपिया या देशांवर अमेरिकेने 10 टक्के शुल्कवाढ केली आहे. कारण तिथे निर्यातदारांचे चार कारखाने आहेत. अमेरिकन शुल्कवाढीवर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
अमेरिकन शुल्कवाढीतून सुटण्यासाठी भारतासमोर इथिओपिया, नायजेरिया, बोटस्वाना आणि मोरोक्को यांसारख्या देशांचे पर्याय आहेत. तिथे सीमा शुल्कापासून विविध कर सवलतीही दिल्या जातात.