Shubhanshu Shukla file photo
आंतरराष्ट्रीय

Axiom-4 : मोहीम फत्ते करून शुभांशु शुक्ला उद्या पृथ्वीच्या दिशेने झेपावणार; जाणून घ्या कसा असेल परतीचा प्रवास

Shubhanshu Shukla : एक्सिओम-४ मिशन अंतर्गत १८ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला परतणार आहेत. जाणून घ्या कसा असेल परतीचा प्रवास

मोहन कारंडे

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) १८ दिवस वास्तव्य केल्यानंतर १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतत आहेत. एक्सिओम-४ (Axiom-4) मोहिमेअंतर्गत शुक्ला यांच्यासोबत कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोज उझ्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे तीन अन्य अंतराळवीर या प्रवासात सहभागी आहेत. हे सर्वजण २६ जून रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले होते.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, चारही अंतराळवीर १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी क्रू ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीच्या दिशेने प्रस्थान करतील. हे यान १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरेल. परतल्यानंतर, शुक्ला यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फ्लाइट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवस राहावे लागेल.

ड्रॅगन यान ६० हून अधिक प्रयोगांचा डेटा घेऊन परतणार

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने शनिवारी सांगितले की, ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवरून चार अंतराळवीरांव्यतिरिक्त ५८० पाउंड (सुमारे २६३ किलो) पेक्षा जास्त सामान, नासाचे हार्डवेअर आणि ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांचा डेटा घेऊन १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहे.

एक्सिओम-४ मिशनच्या कमांडर पेगी व्हिटसन यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरील एका पोस्टमध्ये सांगितले की, त्या आणि त्यांची टीम आयएसएसवरील शेवटच्या दिवसाचा आनंद घेत आहेत. त्यांनी म्हटले की, शुक्ला यांनी आणलेल्या गाजराच्या हलव्याने आणि आमरसाने सर्वांची मने जिंकली आहेत.

अंतराळात शुभांशु शुक्लाची प्रकृती कशी आहे ? 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितले की, अंतराळातून परतणारे शुभांशु शुक्ला यांची प्रकृती उत्तम असून ते उत्साहाने भारलेले आहेत. सात दिवसांच्या पुनर्वसन काळात फ्लाइट सर्जन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवतील.

विशेष म्हणजे, इस्रोने या मोहिमेसाठी सुमारे ५५० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा अनुभव २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयएसएस ताशी २८,००० किलोमीटर वेगाने पृथ्वीची परिक्रमा करते. क्रू ड्रॅगन यान स्वयंचलितपणे स्टेशनपासून वेगळे होईल आणि हळूहळू वेग कमी करून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT