Indian American Voters | भारतीय अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या पक्षाला केले पराभूत 
आंतरराष्ट्रीय

Indian American Voters | भारतीय अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या पक्षाला केले पराभूत

भारतविषयक धोरणापेक्षा देशांतर्गत निर्णयाचा बसला फटका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय अमेरिकन मतदारांनी अमेरिकेच्या भारताविषयीच्या परराष्ट्र धोरणापेक्षा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या देशांतर्गत धोरणांवरील नाराजीमुळे रिपब्लिकन पक्षाविरोधात मतदान केल्याचे समोर आले आहे. राजकीय विश्लेषक सुमित्रा बद्रीनाथन यांनी हा निष्कर्ष मांडला आहे.

अमेरिकन युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्राच्या सहायक प्राध्यापिका सुमित्रा बद्रीनाथन आणि ‘कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’चे मिलन वैष्णव यांनी ‘इंडियन अमेरिकन ॲटिट्युडस्‌ सर्व्हे’ जाहीर केला. बद्रीनाथन यांच्या मते, भारतीय अमेरिकन मतदारांसाठी अमेरिकन नेत्यांची भारताविषयीची भूमिका निर्णायक ठरत नाही. सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांप्रमाणेच रोजगार, महागाई, राहणीमानाचा खर्च आणि एच-१ बी व्हिसा या मुद्द्यांनी त्यांच्या मतदानावर मोठा प्रभाव टाकला.

भेदभावाच्या तक्रारींनंतरही अमेरिकेलाच पसंती

कडक व्हिसा नियम आणि वर्णद्वेषाच्या अनुभवानंतरही भारतीय विद्यार्थी व व्यावसायिकांचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. युरोपीय देशांच्या तुलनेत उच्च शिक्षण आणि करिअरसाठी भारतीय अजूनही अमेरिकेलाच पहिली पसंती देत असल्याचे सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी

या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन काँग्रेसवरील नियंत्रण गमावले असून, डेमोक्रॅटस्‌नी दोन्ही सभागृहांत बहुमत मिळवले आहे. त्यामुळे उर्वरित कार्यकाळात ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इराण युद्धामुळे वाढलेली महागाई हे पराभवाचे कारण ट्रम्प यांनी मानले असले तरी स्थलांतर, आयात शुल्क आणि एच-१बी व्हिसाबाबतचे जाचक नियम यामुळे भारतीय समुदायात प्रचंड नाराजी होती, असे बद्रीनाथन यांनी स्पष्ट केले. टेक्सासमधील रिपब्लिकन नेते बो फ्रेंच यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही मतदारांमध्ये असंतोष पसरला होता.

भारतीय अमेरिकन उमेदवारांची नेत्रदीपक कामगिरी

या निवडणुकीत सहा भारतीय अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात निवडून आले, तर ३० हून अधिक उमेदवारांनी स्थानिक विधिमंडळांमध्ये विजय मिळवला. मात्र, ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या चुरशीच्या लढतीत रिपब्लिकन उमेदवार विवेक रामास्वामी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT