American Politics | अमेरिकेतील भारतीयांसाठी ठरला सोनियाचा दिनू 
आंतरराष्ट्रीय

American Politics | अमेरिकेतील भारतीयांसाठी ठरला सोनियाचा दिनू

न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी, सिनसिनाटी आणि व्हर्जिनियातही मूळच्या भारतीयांचा विजयाचा झेंडा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी झोहरान ममदानी, सिनसिनाटीच्या महापौरपदासाठी आफताब पुरेवाल आणि व्हर्जिनियाच्या उपराज्यपालपदासाठी गझला हाशमी यांनी मंगळवारी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या आणि दक्षिण आशियाई अमेरिकन लोकांसाठी ही एक ऐतिहासिक रात्र ठरली. हा विजय संपूर्ण देशात प्रतिनिधित्व आणि विविधतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

ममदानी न्यू यॉर्क शहराचे मुस्लिम महापौर

झोहरान ममदानी या 34 वर्षीय डेमोक्रॅटिक सोशालिस्ट आमदारांनी अत्यंत चुरशीची न्यूयॉर्क शहर महापौरपदाची निवडणूक जिंकली आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराचे नेतृत्व करणारे पहिले दक्षिण आशियाई आणि मुस्लिम बनले.

युगांडामध्ये जन्मलेले आणि प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर व अभ्यासक महमूद ममदानी यांचे पुत्र असलेल्या ममदानी यांनी अपक्ष म्हणून लढणारे माजी न्यूयॉर्क गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

सिनसिनाटी महापौरपदी आफताब पुरेवाल

दुसर्‍या एका महत्त्वाच्या लढतीत, डेमोक्रॅट पक्षाचे आफताब पुरेवाल यांनी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचे सावत्र भाऊ रिपब्लिकन पक्षाचे कोरी बोमन यांचा पराभव करून सिनसिनाटीचे महापौर म्हणून पुन्हा एकदा विजय मिळवला.

पुरेवाल, त्यांनी पहिल्यांदा 2021 मध्ये महापौरपद जिंकले होते, त्यांना शहरात आर्थिक संधींचा विस्तार करणे आणि सार्वजनिक सेवा सुधारण्याचे श्रेय दिले जाते. हे पद अधिकृतपणे पक्षनिरपेक्ष असले तरी, पुरेवाल यांनी डेमोक्रॅटिक पाठिंब्याने निवडणूक लढवली आणि त्यांनी आधीच सर्वपक्षीय प्राथमिक निवडणुकीत 80 टक्क्यांहून अधिक मतांनी वर्चस्व गाजवले होते.

हाशमी व्हर्जिनियाच्या पहिल्या दक्षिण आशियाई उपराज्यपाल

भारतात जन्मलेल्या 61 वर्षीय गझला हाशमी यांनी व्हर्जिनियामध्ये उपराज्यपाल म्हणून निवडून येऊन इतिहास रचला. त्या या पदावर निवडून येणार्‍या राज्याच्या इतिहासातील पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई अमेरिकन ठरल्या. शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक न्यायाच्या समर्थक असलेल्या हाशमी यांच्या कायदेमंडळातील लक्षामध्ये शिक्षण, पुनरुत्पादक स्वातंत्र्य, आरोग्य सुविधांपर्यंत पोहोच आणि पर्यावरण संरक्षण यांचा समावेश आहे.

ममदानींच्या भाषणात पं. नेहरूंचा संदर्भ

ममदानी यांनी आपल्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रसिद्ध ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषणाचा संदर्भ देत, स्वतःला ट्रम्प युगातील घराणेशाही, धनिकशाही आणि हुकूमशाहीविरुद्ध लढणारे नव्या युगाचे नेते म्हणून सादर केले. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो, जेव्हा आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकतो, जेव्हा एक युग संपते आणि जेव्हा दीर्घकाळ दाबलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. आज रात्री, आपण जुन्यातून नव्यामध्ये पाऊल ठेवले आहे,’ असे ममदानी म्हणाले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नेहरूंच्या प्रसिद्ध भाषणातील शब्दांची आठवण करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT