पुढारी ऑनलाईन डेस्क : भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन ब्रह्मा मोहिमेदरम्यान भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानावर म्यानमारच्या आकाशात जीपीएस स्पूफिंग हल्ला झाला, अशी माहिती संरक्षण स्रोतांनी दिल्याचे 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या हल्ल्यात खोटे जीपीएस सिग्नल वापरून वास्तवातील समन्वय (coordinates) बदलण्यात आले, ज्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन प्रणालीला चुकीची दिशा मिळाली.
वैमानिकांनी तत्काळ कारवाई करत आतील नेव्हिगेशन प्रणाली (INS) वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सुरक्षित नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यात आले. जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबरहल्ला आहे, ज्यात बनावट सिग्नलद्वारे यंत्रणा गोंधळात टाकली जाते. अशाच प्रकारचे स्पूफिंग हल्ले भारत-पाकिस्तान सीमेवरही पूर्वी घडले आहेत. नोव्हेंबर २०२३ पासून अमृतसर आणि जम्मू परिसरात ४६५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
२८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात ३ हजार ६४९ लोकांचा मृत्यू झाला. ५ हजार पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यानंतर शंभरहून अधिक भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे हादरे थायलंड आणि ईशान्य भारतातही जाणवले. भारताने भूकंपग्रस्त म्यानमारला बचावासाठी मदत आणि वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले. २९ मार्च रोजी, C-130J विमानाद्वारे तंबू, ब्लँकेट्स, अत्यावश्यक औषधे आणि अन्न असे साहित्य विमानातून पाठविण्यात आले. आत्तापर्यंत भारताकडून ६ विमाने आणि ५ नौदल जहाजांद्वारे ६२५ मेट्रिक टन साहित्य पाठवले गेले आहे.