मास्को; पीटीआय : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तेल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या दबावाची खिल्ली उडविली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुशार असून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकणार नाहीत, असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला.
सोची शहरात आयोजित ‘वाल्दाई पॉलिसी फोरम’ला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारा कोणताही निर्णय कधीही घेणार नाहीत. रशियाच्या व्यापारी भागीदारांवर जास्त शुल्क लावले गेले, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या ऊर्जा किमतींवर होईल. किमती वाढतील आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर उच्च ठेवण्यास भाग पाडले जाईल, ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल.
पुतीन यांनी मोदींना मित्र संबोधत म्हटले की, ते त्यांच्याशी विश्वासाने चर्चा करू शकतात. रशियन राष्ट्राध्यक्षांनी डिसेंबरच्या सुरुवातीला होणार्या आपल्या भारत दौर्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या सरकारला निर्देश दिले की, भारताच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे जो व्यापार असमतोल निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.