वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन
भारतात सहा अणूऊर्जा प्रकल्प उभारण्यास भारत आणि अमेरिका दरम्यान द्विपक्षीय सहमती झाली आहे. अणूऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचे विदेश सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे सुरक्षा विभागाचे परराष्ट्र राज्यमंत्री ॲन्ड्रू थॉमसन यांच्यात द्विपक्षीय झालेल्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात भारतात सहा अणूऊर्जा प्रकल्प उभारण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा, अणूऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
तसेच दोन्ही देशांदरम्यान जागतिक सुरक्षा, आव्हाने यावरही द्विपक्षीय चर्चा झाली.
भारत आणि अमेरिका यांच्यात २००८ साली ऐताहासिक अणुकरार झाला होता. अमेरिकेबरोबरच फ्रान्स, रशिया, कॅनडा, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ब्रिटन, जपान, व्हियतनाम, बांगलादेश, दक्षिण कोरिया आदी देशांबरोबर भारताने अणूऊर्जा क्षेत्रात करार केले आहेत. आता अमेरिकेसोबत अणूऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.