दावोस (पीटीआय) : स्वित्झर्लंडमधील दावोस या निसर्गरम्य शहरात आजपासून सुरू होणार्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत भारत आपली मोठी ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. विखुरलेल्या जगात ‘संवादाची भावना’ वाढवणे या संकल्पनेवर पाच दिवस चालणार्या या परिषदेत जगातील दिग्गज नेते चर्चा करणार आहेत.
या परिषदेत जगभरातील 64 राष्ट्रप्रमुखांसह 3,000 हून अधिक जागतिक नेते सहभागी होत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मुख्य आकर्षण असतील. गेल्या पाच दशकांत पहिल्यांदाच अमेरिकेने येथे आपले स्वतंत्र यूएसए हाऊस उभारले आहे. या परिषदेत भारताकडून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि उद्योजकांचे मोठे शिष्टमंडळ सहभागी होत आहे.
यामध्ये खालील नावांचा समावेश आहे. यामध्ये मुकेश अंबानी (रिलायन्स), एन. चंद्रशेखरन (टाटा समूह), संजीव बजाज (बजाज समूह), सज्जन जिंदाल, सुनील भारती मित्तल (भारती समूह), नंदन निलेकणी (इन्फोसिस), निखिल कामथ (झेरोधा), विजय शेखर शर्मा आणि रिशाद प्रेमजी (विप्रो) आदी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), एन. चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), मोहन यादव (मध्य प्रदेश), ए. रेवंत रेड्डी (तेलंगणा) आणि हेमंत सोरेन (झारखंड). तसेच गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि उत्तर प्रदेश व केरळचे उच्चस्तरीय शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे.
काही भांडवलशाहीविरोधी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे. स्विस सरकारने स्पष्ट केले आहे की, लोक आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणाचे नियम पाळले गेल्यास निदर्शनांना परवानगी दिली जाईल. मात्र, अनधिकृत आंदोलने किंवा गुन्हेगारी कृत्य करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.