काश्मीर प्रश्नी बोलणाऱ्या पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भारताने संयुक्त राष्ट्राच्या महासभेत खडसावले. (Image source -X)
आंतरराष्ट्रीय

हा तर ढोंगीपणा! काश्मीर प्रश्नी बोलणाऱ्या पाक PM शरीफांना भारताने खडसावले

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shebaz Sharif) यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (UNGA) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये तणाव वाढवत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला शनिवारी भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रातील (UN) भारताच्या प्रथम सचिव भाविका मंगलानंदन यांनी बोलताना, २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ला आणि २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक घटनांचा हवाला देत भारताविरुद्ध सीमापार दहशतवादाचा वापर केल्याचा पाकिस्तानवर आरोप केला. "यादी मोठी आहे," असे मंगलानंदन यांनी पाकिस्तानच्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देताना सुनावले.

त्या पुढे म्हणाल्या, "भारत दहशतवाद्याच्या मुद्यावर कधीही तडजोड करणार नाही" आणि भारताविरूद्ध पाकिस्तानचा सीमापार दहशतवाद अपरिहार्यपणे परिणामांना आमंत्रण देत आहे."

"आम्ही एका देशाबद्दल बोलत आहोत ज्याने ओसामा बिन लादेनची दीर्घकाळ खातीरदारी केली. जगभरातील अनेक दहशतवादी घटनांमागे त्याच देशांचा हात आहे. ज्यांच्या धोरणांमुळे अनेक घटकांना आपले घर बनवण्यासाठी आकर्षित केले आहे," असे मंगलानंदन यांनी राइट टू रिप्लाय अधिकाराचा वापर करत पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला.

पाकिस्तानचा कांगावा

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची कृती “एकतर्फी आणि बेकायदेशीर” असल्याचा कांगावा करत भारताने हा निर्णय मागे घेण्याचा सूर शरीफ यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर भारताने पाकिस्तानला खडसावले.

'जो देश लष्कर चालवत आहे'

मंगलानंदन यांनी, पाकिस्तानचा उल्लेख "दहशतवाद, अंमली पदार्थ आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी जागतिक प्रतिष्ठा असलेला "लष्कर चालवत असलेला देश" असा शब्दांत केला आहे.

जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग

त्या म्हणाल्या की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने हिंसक मार्गाने या भागातील शांतता बिघडवण्याचा आणि निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा देशाने कुठल्याही हिंसाचाराबद्दल बोलणे हे ढोंगीपणा आहे, असे सांगून त्यांनी पाकिस्तानच्या कृतीचा निषेध नोंदवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT