वाशिंग्टन : रशियन माध्यमे स्पुतनिक आणि आरटीवर भारताने बंदी घालावी, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त करत जगभरातही ती घालण्याचे प्रयत्न तीव्र केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अमेरिकन अधिकार्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली असून, भारतातील पत्रकारितेसाठी आरटीला दिलेली मान्यता काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत भारताकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, एखाद्या माध्यमावर बंदी घालणे हा पाश्चिमात्य देशांचा दुटप्पीपणा असल्याचे मत एका तज्ज्ञाचे आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियावरील निर्बंधांची नवीन यादी जाहीर केली असून, यामध्ये रशियाच्या अनेक मीडिया नेटवर्कचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतात कार्यरत असलेल्या आरटी आणि स्पुतनिक यांचाही समावेश आहे. मीडिया नेटवर्क रशियन गुप्तचरांसाठी काम करतात. त्यांनी अमेरिका आणि जर्मनीमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचे काम केले आहे.
मीडिया नेटवर्कवर रशियाच्या लष्करासाठी देणग्या गोळा केल्याचा आरोपही ब्लिंकन यांनी केला आहे. जगभरातील अमेरिकन राजदूतांनी रशियन मीडिया नेटवर्कच्या विरोधात सापडलेले सर्व पुरावे अमेरिकन सरकारशी शेअर करण्याचे आदेश बायडेन सरकारने दिले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत झालेल्या बैठकीत आरटी आणि स्पुतनिकवर बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
अमेरिकेची ही कृती जर्मनीच्या हिटलरसारखी आहे. अमेरिका जगभरात रशियाविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. रशियन तेल खरेदी केल्यानंतर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. आता रशियन माध्यमांवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी केला आहे.