मॉस्को; वृत्तसंस्था : रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह स्टेट ड्यूमाने मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील एका महत्त्वाच्या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे. या करारामुळे दोन्ही देशांची सैन्यदले एकमेकांचे लष्करी तळ, सुविधा आणि संसाधने वापरू शकतील. या करारानुसार, दोन्ही देशांची विमाने आणि युद्धनौका इंधन भरण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर लॉजिस्टिक सुविधांसाठी एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर करू शकतील. यावर येणारा खर्च दोन्ही देशांकडून समान वाटून घेतला जाईल. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौर्याच्या दोन दिवस आधी या कराराला मंजुरी देण्यात आली आहे. हा करार यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी भारत आणि रशिया यांच्यात झाला होता. गेल्या आठवड्यात रशियन पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांनी हा करार संसदेत मंजुरीसाठी पाठवला होता. रशियन संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले की, भारत आणि रशियाचे संबंध खूप मजबूत आहेत आणि हा करार ते संबंध अधिक द़ृढ करेल. रशियन सरकारनेही स्पष्ट केले आहे की, या करारामुळे दोन्ही देशांची लष्करी भागीदारी अधिक मजबूत होईल आणि गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करणे सोपे होईल.
भारताचा रशियासोबत 2 अब्ज डॉलर्सचा करार
भारताने रशियाकडून अणुऊर्जेवर चालणारी हल्ला करणारी पाणबुडी सुमारे 2 अब्ज डॉलर्समध्ये भाडेतत्त्वावर घेण्याचा करार अंतिम केला आहे. जवळपास एक दशक चाललेल्या वाटाघाटी या करारामुळे यशस्वी झाल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक द़ृढ झाले आहे.
ही पाणबुडी केवळ प्रशिक्षणासाठी वापरली जाणार असून, ती दोन वर्षांत भारताला मिळेल. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, पाणबुडी भाड्याने घेण्याबाबतची चर्चा किमतीच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ अडकली होती. आता वाटाघाटी यशस्वी झाल्या असून, भारतीय पथकाने नोव्हेंबरमध्ये रशियन शिपयार्डला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला. 10 वर्षांच्या या करारानुसार, ही पाणबुडी प्रत्यक्ष युद्धात तैनात करता येणार नाही, तर तिचा वापर भारताच्या अणु-पाणबुडी मोहिमांच्या प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी केला जाईल.
पुतीन यांच्या दौर्यापूर्वी नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले की, ही हल्ला करणारी पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होण्याची अपेक्षा आहे; मात्र त्यांनी अधिक तपशील दिला नाही. हे जहाज भारताच्या सध्याच्या दोन अणुऊर्जेवर चालणार्या पाणबुड्यांपेक्षा मोठे असेल.