Pahalgam terrorist attack
दिल्ली : भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीनेच धीर खचलेल्या पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. मदरसे रिकामे केले आहेत. तर हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्याला ठेवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराच्या तिन्ही दलांना लक्ष्य, वेळ आणि दिवस ठरवा... यासाठीचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना आहे. दहशतवादाला वरदहस्त देणाऱ्यांना त्यांनी विचारही केला नसेल, असा धडा शिकवा, असे आदेश आहेत. त्यामुळे भारत कधीही लष्करी कारवाई करेल, या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये थरकाप उडाला आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी गुरुवारी परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने पीओकेमधील १ हजारहून अधिक मदरसे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून लक्ष्य करेल या भीतीने १० दिवसांसाठी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेसाठी नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने हल्ला केल्यास अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असा दावा पीओके सरकारने केला आहे. आपत्कालीन निधीत एक अब्ज रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्न समारंभाचे हॉल सैन्याला राहण्यासाठी दिले आहेत. शाळांमध्ये मुलांना हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. गुरुवारी पाक अधिकाऱ्यांनी नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील इतर संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरून परत पाठवण्यात आले. लिपा व्हॅलीमधील रहिवाशांना नियंत्रण रेषेजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. तसेच सुरक्षा एजन्सींना सहकार्य करण्यास सांगितले आहे.
या महिन्यात कराची आणि लाहोर हवाई हद्दीतील विमान वाहतूक दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील हवाई क्षेत्र आधीच बंद केलं आहे. इस्लामाबाद ते गिलगिट-स्कर्दूला जाणारी विमाने सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे इस्लामाबादमधील पाच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचे उड्डाण उशिराने झाले तर काही इतर शहरांमध्ये वळवण्यात आली. 'भारतीय सैन्याकडून गोळीबार होत आहे, ज्यामुळे नुकसान झाले आहे. प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहोत,' असे चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले.