India-Pakistan Conflict World Bank President Ajay Banga on Indus Waters Treaty
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सिंधू जल करारासंदर्भात वर्ल्ड बँकेच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असताना, वर्ल्ड बँकचे अध्यक्ष अजय बंगा यांनी स्पष्टपणे सांगितले की, "संधी निर्माण करणाऱ्या संस्थेपलीकडे वर्ल्ड बँकेची यात कोणतीही भूमिका नाही."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करार तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याच्या काही दिवसांनंतर अजय बंगा यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका स्पष्ट केली.
अजय बंगा म्हणाले, "भारत सरकारने करार पूर्णतः निलंबित केलेला नाही. भारत सरकारच्या मते तो सध्या abeyance म्हणजेच तात्पुरत्या थांबलेल्या स्थितीत आहे. मूळ सिंधू जल कराराच्या चौकटीत निलंबनाची तरतूदच नाही.
हा करार रद्द केला जाऊ शकतो किंवा नवीन कराराच्या माध्यमातून त्याची जागा घेतली जाऊ शकते, पण त्यासाठी दोन्ही देशांचा परस्पर सहमतीने निर्णय आवश्यक आहे," असे ते म्हणाले
.वर्ल्ड बँकचा यामधील सहभाग स्पष्ट करताना अजय बंगा म्हणाले, "वर्ल्ड बँक हा कोणताही निर्णय घेणारा पक्ष नाही. जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मतभेद झाले, तर वर्ल्ड बँक केवळ सुविधादाता म्हणून काम करते — म्हणजेच, तटस्थ तज्ज्ञ अथवा मध्यस्थी न्यायालय नियुक्त करण्याच्या प्रक्रियेसाठी मदत करते."
सिंधू जल कराराला गेल्या सहा दशकांमध्ये अनेक चढउतार आले, याची आठवण करून देताना अजय बंगा म्हणाले, "वर्ल्ड बँकची भूमिका जशी करारात सांगितली आहे, तशीच राहील — ना अधिक, ना कमी."
त्यांनी सांगितले की, सिंधू जल कराराच्या स्थापनेदरम्यान विश्वस्त निधी (Trust Fund) स्थापन करण्यात आला होता, ज्यातून अशा तटस्थ तज्ज्ञांचे मानधन दिले जाते. "हीच आमची भूमिका आहे. यापुढे वर्ल्ड बँकेला कोणतीही जबाबदारी नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड बँक संभाव्य हस्तक्षेप करेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. मात्र अजय बंगा यांनी ती पूर्णपणे फेटाळून लावली.
"ही सर्व चर्चा फोल आहे. करार दोन सार्वभौम देशांमधील आहे. हा करार सुरू ठेवायचा की नाही, हे त्यांच्याच निर्णयावर अवलंबून आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.