India Pakistan ceasefire:
वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविराम कधीही संपुष्टात येऊ शकतो, त्यामुळे अमेरिका दररोज दोन्ही देशांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे ज्येष्ठ खासदार मार्को रुबिओ यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भीती व्यक्त केली. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना रुबिओ म्हणाले, "जेव्हा दोन्ही बाजू थांबायला तयार होतात, तेव्हाच शस्त्रसंधी शक्य होते. मात्र, ती टिकवून ठेवणे अत्यंत कठीण असते. युक्रेन युद्धाप्रमाणेच शस्त्रसंधी कधीही मोडली जाऊ शकते. आम्ही केवळ भारत-पाकिस्तानच नव्हे, तर कंबोडिया-थायलंडसारख्या देशांतील परिस्थितीवरही दररोज लक्ष ठेवून असतो. आमचे ध्येय केवळ तात्पुरती शांतता नाही, तर भविष्यात युद्ध टाळण्यासाठी एक स्थायी शांतता करार घडवून आणणे आहे."
ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक
दुसऱ्या एका मुलाखतीत रुबिओ यांनी भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, "ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात जागतिक शांततेला प्राधान्य दिले होते. भारत-पाकिस्तान, कंबोडिया-थायलंड आणि रवांडा-काँगो यांसारख्या देशांमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. जगात शांतता प्रस्थापित करण्याची एकही संधी न सोडणारा राष्ट्राध्यक्ष आपल्याला लाभला, हे आपले भाग्य आहे."