वाराणसी : भारत आणि मॉरिशस स्थानिक चलनांमध्ये द्विपक्षीय व्यापार सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासोबतच्या व्यापक चर्चेनंतर सांगितले.
माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांवर भर देत म्हटले की, भारत आणि मॉरिशस हे दोन देश असले, तरी त्यांची स्वप्ने आणि भवितव्य एकच आहे. पंतप्रधान म्हणाले की, एक मुक्त, खुला, सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध हिंद महासागर हे भारत आणि मॉरिशस या दोघांचेही सामाईक प्राधान्य आहे. या संदर्भात, मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सुरक्षा आणि सागरी क्षमता मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
मे महिन्यात, युनायटेड किंगडमने (यूके) एका ऐतिहासिक करारानुसार दिएगो गार्सिया या उष्णकटिबंधीय प्रवाळ बेटासह चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 50 वर्षांहून अधिक काळानंतर ब्रिटन या बेटांवरील आपले हक्क सोडत आहे. या करारानुसार, सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दिएगो गार्सियाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी यूकेकडे असेल.