India-Italy relations | भारत-इटली संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा; मोदींकडून मेलोनी यांना भारत भेटीचे निमंत्रण 
आंतरराष्ट्रीय

India-Italy relations | भारत-इटली संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा; मोदींकडून मेलोनी यांना भारत भेटीचे निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

रोम; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौर्‍यात भारत आणि इटली यांच्यातील संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांनी परस्पर संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेमुळे व्यापार, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, अवकाश संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांतील सहकार्य आणखी मजबूत होणार आहे.

या भेटीत मोदी यांनी मेलोनी यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही नेत्यांनी गेल्या काही वर्षांत वाढलेल्या द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख करत परस्पर विश्वास आणि मैत्री अधिक द़ृढ झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे भारताने यापूर्वी अमेरिका, फ्रान्स, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबत ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ स्थापन केली आहे.

‘रोम आणि काशी’चा सांस्कृतिक संदर्भ

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले, “रोमला जगात ‘इटर्नल सिटी’ म्हणून ओळखले जाते. माझा लोकसभा मतदारसंघ असलेली काशीदेखील प्राचीन संस्कृती आणि ऐतिहासिक वारशामुळे ओळखली जाते. दोन संस्कृती एकत्र आल्या की संवाद केवळ राजकीय अजेंड्यापुरता मर्यादित राहत नाही; त्यात इतिहासाची खोली, भविष्याची दिशा आणि मैत्रीची सहजता दिसून येते.” मोदी यांनी इटली सरकारने केलेल्या स्वागताबद्दल आभार मानत भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला इटलीने दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले.

इटालियन चित्रकाराची भेट

मोदींनी इटालियन चित्रकार ज्याम्पाओलो तोमासेत्ती यांची भेट घेतली. भारतीय संस्कृती आणि वाराणसीवर आधारित त्यांच्या कलाकृती मोदींना भेट देण्यात आल्या. मोदी म्हणाले, तोमासेत्ती चार दशकांपासून भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. त्यांनी महाभारतावर 23 मोठी चित्रे तयार केली.

व्यापार 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याचे लक्ष्य

दोन्ही देशांनी 2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या भारतात 400 पेक्षा अधिक इटालियन कंपन्या कार्यरत असून अभियांत्रिकी, उत्पादन, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत त्यांची गुंतवणूक आहे. मेलोनी यांनी सांगितले की, 2025 मध्ये भारत-इटली व्यापार सुमारे 16.77 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तसेच एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत इटलीने भारतात 3.66 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

दिल्लीत भारत-इटली इनोव्हेशन सेंटर...

तंत्रज्ञान आणि नवकल्पना हे भारत-इटली भागीदारीचे मुख्य केंद्रबिंदू असतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, नागरी अणुऊर्जा, अवकाश संशोधन आणि स्टार्टअप्स क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे काम करणार आहेत. यासाठी नवी दिल्लीमध्ये भारत-इटली इनोव्हेशन सेंटर उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. हे केंद्र स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि उद्योगक्षेत्र यांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे.

2027 हे ‘इंडिया-इटली वर्ष’म्हणून साजरे होणार

भारत आणि इटली यांनी 2027 हे वर्ष ‘इटली-इंडिया इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम’ म्हणून साजरे करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे सांस्कृतिक संबंध, पर्यटन आणि लोकसंपर्क अधिक बळकट होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मेलोनी यांना मोदींकडून मेलोडी टॉफी गिफ्ट

पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना एक खास आणि हटके भेट दिली आहे. हे गिफ्ट म्हणजे भारतातील लोकप्रिय मेलोडी टॉफी. या टॉफीचे पूर्ण पाकीट मोदींनी मेलोनींना दिले. या गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. मेलोनी यांनी स्वतः या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. “थँक यू फॉर द गिफ्ट,” असे लिहित त्यांनी ही पोस्ट शेअर केली. त्यानंतर मेलोडी हॅशटॅग पुन्हा चर्चेत आला. गेल्या काही वर्षांत जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटींनंतर सोशल मीडियावर मेलोडी हा हॅशटॅग लोकप्रिय झाला होता. ‘मेलोनी’ आणि ‘मोदी’ या नावांपासून तयार झालेला हा शब्द दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचं प्रतीक मानला जाऊ लागला. यावेळी मोदींनी याच ट्रेंडला मजेशीर ट्विस्ट देत मेलोनींना ‘मेलोडी’ टॉफी भेट दिली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी याला ‘स्मार्ट डिप्लोमसी’ आणि ‘चॉकलेट डिप्लोमसी’ असे म्हटले आहे. मोदी आणि मेलोनी यांची पहिली भेट 2022 मध्ये इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-20 समिटमध्ये झाली होती.

साडेतीन वर्षांत मोदींसोबत सातवी भेट : मेलोनी

मेलोनी यांनीही भारतासोबतचे संबंध ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “मागील साडेतीन वर्षांत माझी मोदींसोबत सात वेळा भेट झाली आहे. या भेटींमुळे आम्हाला एकमेकांचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आला. आदर आणि परस्पर विश्वासातून खरी मैत्री निर्माण झाली आहे. भारत आणि इटली आता आपल्या संबंधांची पूर्ण क्षमता गाठण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळेच दोन्ही देशांनी संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT