तेल अविव : भारत एक मोठी जागतिक महाशक्ती आहेे. जगातील अनेक देश इस्रायलवर टीका करत असताना आणि त्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असताना, भारताने मात्र नेहमीच इस्रायलची खंबीर साथ दिली आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले.
नेतान्याहू यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले की, ‘आम्ही आमच्या जागतिक आघाड्यांचा विस्तार करत आहोत आणि या विस्तारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारत या महाशक्तीसोबत असलेले आमचे अनोखे संबंध आहेत. जगाच्या अनेक भागांत इस्रायलला विरोध होत असला, तरी भारतात तसे चित्र नाही. भारतात इस्रायलसाठी लोकांच्या मनात अफाट आणि वेड लावणारे प्रेम आहे. इतकेच नाही, तर सोशल मीडियावर माझे सर्वाधिक फॉलोअर्स हे भारतातूनच आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सध्या इस्रायल अनेक आघाड्यांवर सुरक्षा आव्हानांचा सामना करत आहे. अशा कठीण काळात पारंपरिक मित्रांच्या पलीकडे जाऊन नवीन आणि मजबूत भागीदार शोधण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. नेतान्याहू यांनी यापूर्वीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या घनिष्ठ वैयक्तिक मैत्रीचा आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा अनेकदा गौरव केला आहे. संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी अशा विविध क्षेत्रांत दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने वाढत आहे.