मॉस्को : रशिया-युक्रेन संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यास भारताचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पंतधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिली.
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचे कजान येथे आगमन झाले. यावेळी पुतीन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी मोदी म्हणाले, रशिया-युक्रेन संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघायला हवा, अशी भारताची भूमिका राहिली आहे. याआधीही भारताने दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटणार नाही. युद्ध असो अथवा दहशतवादी हल्ला, यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते. आमचा मानवतेवर विश्वास आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी भारताकडून पूर्णपणे सहकार्य आणि मदत करण्यात येईल, असा पुनरुच्चारही मोदी यांनी यावेळी केला.
याआधी मोदी यांनी जुलै महिन्यात रशियाला भेट दिली होती. त्यावेळीही मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले होते. रशियाच्या दुसर्या दौर्यामध्येही मोदी यांनी पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करताना त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. दरम्यान, ब्रिक्स परिषदेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
ब्रिक्सच्या 16 व्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुतीन यांनी भारताशी घनिष्ठ मैत्री असल्याचे नमूद केले. भारत आणि रशिया ब्रिक्सचे मूळ सदस्य आहेत. भारत हा रशियाचा शक्तिशाली मित्र असल्याने मोदींशी चर्चा करताना अनुवादकाची गरज लागत नसल्याची भावना पुतीन यांनी यावेळी व्यक्त केली. पुतीन यांच्या या युक्तिवादानंतर चर्चेदरम्यान हशा पिकला.