पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता प्रस्थापित सुधारणांवरील चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा (Jammu and Kashmir issue) पुन्हा एकदा उपस्थित केल्याबद्दल भारताने मंगळवारी पाकिस्तानला जोरदार फटकारले. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे जो काही प्रदेशातील भाग व्यापला आहे तो खाली करावा लागेल, असा इशारा भारताने दिला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संबोधित करताना भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानकडून करण्यात आलेला वारंवार उल्लेख 'अयोग्य' असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, अशा शब्दांत पुनरुच्चार केला.
"भारताला याची दखल घ्यावी लागत आहे की पाकिस्तानच्या प्रतिनिधीने पुन्हा एकदा भारताचा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरबाबत अनावश्यक टिप्पणी केली. असा वारंवार उल्लेख केल्यामुळे त्यांचे बेकायदेशीर दावे सिद्ध होत नाहीत अथवा त्यांच्या सीमापार दहशतवादाचे समर्थन होत नाही," असे हरीश यांनी पाकिस्तानला बजावून सांगितले.
भारतीय राजदूतांनी या मुद्यावर देशाच्या दीर्घकालीन भूमिकेला दुजोरा देत नमूद केले की, "जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील." पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवत असल्याचे सांगत त्यांनी या प्रदेशावरील ताबा सोडावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
"पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरचा भूभाग बेकायदेशीरपणे कब्जा करत आहे. तो त्यानी खाली केला पाहिजे. आम्ही पाकिस्तानला सल्ला देतो की त्यांनी त्यांचा संकुचित दृष्टीकोन आणि फुटीरवादी अजेंडा पुढे रेटण्यासाठी या मंचाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही हरीश म्हणाले.
गेल्या आठवड्यातही भारताने जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHR) बैठकीत पाकिस्तानला फटकारले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे आरोप फेटाळून लावले होते.