Sergey Lavrov | रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत भारताने घोषणा केलेली नाही 
आंतरराष्ट्रीय

Sergey Lavrov | रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत भारताने घोषणा केलेली नाही

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को; वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदी थांबवण्यासाठी दबाव टाकल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला असला, तरी भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कोणत्याही भारतीय नेत्याकडून अशा प्रकारचे विधान आलेले नसून, अमेरिका केवळ शुल्क आणि निर्बंधांच्या माध्यमातून भारत आणि इतर ब्रिक्स देशांवर रशियन तेलापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लावरोव्ह यांनी केला आहे. रशियाच्या स्टेट ड्यूमामध्ये (संसदेत) खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकताना लावरोव्ह यांनी डिसेंबर 2025 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौर्‍याचा उल्लेख करत, या दौर्‍यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या असून, यामुळे दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत झाल्याचे सांगितले.

दोन्ही देशांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल बोलताना लावरोव्ह यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत सांगितले की, रशिया भारतासोबतचे संबंध भारताच्या इच्छेनुसार पुढे नेण्यास पूर्णपणे तयार असून, दोन्ही देशांमधील सहकार्याला कोणतीही सीमा नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ब्रिक्स गटामध्ये 10 देशांचा समावेश झाला असून, भारताच्या नेतृत्वाखाली ही संघटना आणि रशिया-भारत मैत्री जागतिक स्तरावर अधिक द़ृढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT