पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या भूमीवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी आणि खलिस्तानी समर्थकांना प्रोत्साहन देत असणार्या कॅनडाने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केला आहे. भारत आणि चीन २८ एप्रिल रोजी कॅनडामध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करुन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा दावा कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या उपसंचालक व्हेनेसा लॉयड यांनी केला आहे. दरम्यान, यापूर्वीही कॅनडाने असेच आरोप केले हाोंंत जे भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
इटलीचे नवनियुक्त पंतप्रधान मार्क कार्नी यांनी २८ एप्रिल रोजी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने सोमवारी दावा केला की, भारत आणि चीन आगामी कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच रशिया आणि पाकिस्तान देखील असे करण्याचा प्रयत्न करू शकतात.
कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिसच्या उपसंचालक व्हेनेसा लॉयड म्हणाल्या की, विरोधी सरकारी घटक निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत्या प्रमाणात करत आहेत. "पीआरसी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) कॅनडाच्या लोकशाही प्रक्रियेत, या सध्याच्या निवडणुकीसह, हस्तक्षेप करण्यासाठी एआय-सक्षम साधनांचा वापर करेल अशी दाट शक्यता आहे." भारत सरकारकडे कॅनेडियन समुदायांमध्ये आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू आणि क्षमता आहे," असा दावाही त्यांनी केला आहे.
कॅनडा आपल्या भूमीवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी घटकांना आणि खलिस्तानी समर्थकांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो गेल्या वर्षी २०१९ आणि २०२१ च्या कॅनडाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या समितीसमोर हजर झाले होते. यावेळी परकीय शक्तींनी निवडणुकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. अलिकडच्या काही महिन्यांत, कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये अभूतपूर्व राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही देशांनी त्यांच्या मिशन प्रमुखांसह अनेक राजदूतांना हद्दपार केले.