India defense exports growth | जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचा डंका 
आंतरराष्ट्रीय

India defense exports growth | जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचा डंका

रशियन पत्रकार व्हॅसिली गोलोवनिन यांची पोस्ट चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार नेतृत्वाखाली शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारत एक प्रबळ खेळाडू म्हणून उभा राहिला असून भविष्यात भारतीय शस्त्रे जागतिक पातळीवर अनेक वर्षांपासून वर्चस्व गाजवणार्‍या देशांना मागे टाकणार असल्याचे प्रसिद्ध रशियन पत्रकार व्हॅसिली गोलोवनिन यांनी म्हटले आहे.

एका टेलिग्राम चॅनेलवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, जागतिक शस्त्र बाजारपेठेत रशियापुढे भारताने मोठे आव्हान निर्माण केले आहे. 2025 मध्ये भारताची संरक्षण निर्यात 4 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्ता हाती घेतली तेव्हाच्या तुलनेत ही निर्यात 56 पटींनी जास्त आहे. हा आकडा थक्क करणारा आहे. भारताने 2020 नंतर जागतिक शस्त्र बाजारपेठांमध्ये आपली पकड निर्माण केली आहे. आता भारताच्या एकूण शस्त्र निर्यातीत फिलिपाईन्सचा वाटा 42 टक्के आहे. त्यानंतर आर्मेनिया (32 टक्के) आणि व्हिएतनाम (11 टक्के) यांचा क्रमांक लागतो. यात त्यांनी आर्मेनियाचा विशेष उल्लेख केला आहे. हा देश काही वर्षांपूर्वीपर्यंत रशियन शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. तथापि, तो आता भारतीय शस्त्रे खरेदी करू लागला आहे.

भारताचा वेग थक्क करणारा

एकेकाळी रशिया हा अमेरिका आणि फ्रान्ससह जगातील सर्वाधिक शस्त्रे विकणारा देश होता. मात्र अनेक देशांनी आता भारतीय शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. भारताचा यासंदर्भातील वेग थक्क करणारा आहे, असेही गोलोवनिन यांनी म्हटले आहे. जपानी पत्रकार यासुओ ताकुची यांनीही याबाबतीत भारताने निर्माण केलेल्या दबदब्याबद्दल स्वतंत्र लेख लिहिला आहे. ते म्हणतात, भारत आता केवळ शस्त्रे खरेदी करणारा देश राहिला नसून, तो एक प्रमुख निर्यातदार देश बनण्याच्या दिशेने वेगाने निघाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT