भारतीय आणि चिनी सैन्याने LAC च्या डेपसांग आणि दमचोक भागात गस्त घातली. Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

डेपसांग, दमचोकमध्ये LAC वर भारत - चीन सैन्याकडून गस्त सुरू

India-China LAC | दोन्ही देशांमध्ये मतभेद सोडवण्यावर एकमत

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि चीन देशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीत मागील काही दिवसांत लक्षणीयरीत्या सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही लष्कराने पुन्हा एकदा LAC लगतच्या भागात गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. मागील साडेचार वर्षांपासून LAC वर गस्त बंद करण्यात आली होती. भारतीय आणि चिनी सैन्याने गुरुवारी LAC च्या डेपसांग आणि दमचोक भागात गस्त घातली. गस्तीपूर्वी दोन्ही सैन्याने या गस्तीची माहितीही शेअर केली होती. या गस्तीदरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही.

डेपसांग आणि डेमचोकमध्ये गस्त सुरू

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) दमचोक आणि डेपसांगमध्ये भारतीय आणि चिनी सैन्याने गस्त सुरू केली आहे. एप्रिल 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध खूपच बिघडले होते. पण आता राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये मतभेद सोडवण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान देपसांग आणि डेमचोक भागात गस्त सुरू झाली आहे.

 सैनिकांनी दिवाळीला मिठाई वाटली

दिवाळी निमित्ताने गुरुवारी भारतीय आणि चिनी सैनिकांनी चुशुल मालदो, दौलत बेग ओल्डी, लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि अरुणाचल प्रदेशातील किबुटूजवळील बांचा, बुमला आणि नाथुला येथे मिठाईचे वाटप केले. गुरुवारी भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गस्तीदरम्यान कोणतीही अडचण जाणवली नाही. गस्ती पथकात 10 ते 15 शिपाई होते. एप्रिल 2020 पूर्वी दोन्ही बाजूंनी गस्त घातली. आता दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना माहिती देऊन गस्त घालतात.

संबंध चांगले होत आहेत

याआधी दोन्ही देशांच्या सैन्यात गस्तीदरम्यान चकमकी होत होत्या. वादविवाद झाले, झेंडे दाखवले गेले. आता हा वाद टाळण्यासाठी एकमेकांना माहिती देऊन गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय सैनिक जितक्या वेळा गस्तीसाठी जातात, तितक्याच वेळा चिनी सैनिक गस्त घालण्यासाठी जातात. देपसांग आणि डेमचोक भागात वाद होऊ नयेत, यासाठी दोन्ही देशांचे स्थानिक कमांडर स्तरावर सातत्याने चर्चा करत आहेत.

भारत-चीन वाद संपवण्यावर भर

दोन वर्षांपूर्वी, गलवान, गोगरा, हॉट स्प्रिंग आणि पँगॉन्ग त्से तलाव येथे आधीच विलगीकरण झाले होते. चारही ठिकाणी अर्धवट गस्त सुरू होती. वाद टाळण्यासाठी येथे बफर झोनही तयार करण्यात आले असून भविष्यात देपसांग आणि डेमचोक भागात सर्व काही सुरळीत पार पडल्यास इतर ठिकाणीही वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, यासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT