India Pakistan Ceasefire 2025
नवी दिल्ली : अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्ध विरामासाठी पूर्णपणे सहमती दर्शवली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केली. याबाबतची माहिती त्यांनी X वर पोस्ट करत दिली. त्यापाठोपाठ पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही, "पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे," असे X वर पोस्ट करत सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ६ मे च्या मध्यरात्रीपासून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानातीलचे ९ दहशतवादी तळ पूर्णपणे उध्वस्त केले आणि या कारवाईत १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवरील ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यामुळे तणाव वाढला होता.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी लगेच या घडामोडीविषयी पुष्टी केली. त्यांनी सांगितले, "पाकिस्तानच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज, या समझोता कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील."
"अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यावर सहमती दर्शवली. समंजस भूमिका आणि मुत्सद्दीपणा दाखवल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या मुद्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद!", असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, यापुढे कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानने शनिवारी पहाटे देशाच्या पश्चिम सीमेला लक्ष्य केले. त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.
पाकिस्तानने ८ ते ९ मे रोजीच्या मध्यरात्री भारताच्या सैन्य स्थळांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर लेहपासून सरक्रीकपर्यंत पाकने ३०० ते ४०० ड्रोन हल्ले केले. पाकचे हे ड्रोन हल्ले भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने हाणून पाडले.