India-Canada Relation : भारत आणि कॅनडामधील नवीन मैत्री पर्वाला प्रारंभ झाल्‍याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्‍यातील बैठकीनंतर मिळाले. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

India-Canada Relation : भारत-कॅनडा मैत्रीचे नवे पर्व सुरु, नवीन उच्चायुक्त नियुक्तीवर सहमती

जी ७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांच्यात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

India-Canada Relation : भारत आणि कॅनडामधील नवीन मैत्री पर्वाला प्रारंभ झाल्‍याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्‍यातील बैठकीनंतर मिळाले. बैठकीदरम्यान दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये भारत आणि कॅनडा नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यास सहमत झाले आहेत. दोन्ही देश सामान्य राजनैतिक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती करतील.

कॅनडा-भारत संबंधांचे महत्त्‍व दोन्‍ही नेत्‍यांनी केले अधोरेखित

कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्नी यांनी परस्पर आदर, कायद्याचे राज्य आणि सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वाच्या प्रतिबद्धतेवर आधारित कॅनडा-भारत संबंधांचे महत्त्व पुन्हा सांगितले. दोन्ही नेत्यांनी नागरिकांना आणि व्यवसायांना नियमित सेवा पुनर्संचयित करण्याच्या उद्देशाने नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती करण्यास सहमती दर्शविली आहे. परस्पर आदर, कायद्याचे राज्य आणि सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वाच्या प्रतिबद्धतेवर आधारित कॅनडा-भारत संबंधांचे महत्त्व दोन्‍ही नेत्‍यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा

या बैठकीबाबत माहिती देताना परराष्‍ट्र सचिव विक्रम मिस्‍त्री यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या प्रमुखांनी या महत्त्वाच्या संबंधात स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी संतुलित पावले उचलण्यास सहमती दर्शविली. एकमेकांच्या राजधानींमध्ये उच्चायुक्तांची लवकरात लवकर पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला पहिला टप्पा होता. कालांतराने इतर राजनैतिक पावले देखील उचलली जातील. दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार, लोकांशी संपर्क संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये वरिष्ठ आणि कार्यकारी स्तरावरील यंत्रणा आणि चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. या सर्व बैठकींचा उद्देश संबंधांना अधिक गती देणे हा होता. दोन्ही नेत्यांनी स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, एआय, अन्न सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि पुरवठा साखळीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर संभाव्य सहकार्यावरही चर्चा केली.

निवडणुकीत विजयाबद्दल PM माेदींनी केले कार्नी यांचे अभिनंदन

कॅनेडियन समकक्षाशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्क कार्नी यांचे निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की भारत आणि कॅनडामधील संबंध अनेक प्रकारे खूप महत्वाचे आहेत. कॅनेडामधील अनेक कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे. भारतातील लोकांची कॅनेडियन भूमीवर मोठी गुंतवणूक आहे. लोकशाही मूल्यांना समर्पित, कॅनडा आणि भारताला एकत्रितपणे लोकशाही मजबूत करावी लागेल, मानवता मजबूत करावी लागेल. आम्‍ही एकत्रितपणे भारत-कॅनडा संबंधांना आणखी दृढ करु. भारत आणि कॅनडामधील संबंध खूप महत्वाचे आहेत आणि आपण दोन्ही देशांना फायदेशीर ठरतील अशा अनेक क्षेत्रात एकत्र पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्‍यक्‍त केली.

पंतप्रधान मोदींचे आतिथ्य करणे हा सन्मान : कार्नी

जी७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे आतिथ्य करणे हा सन्मान आहे. भारत २०१८ पासून जी-७ परिषदांमध्ये सहभागी होत आहे. या माध्‍यमातून भारताची भूमिका आणि नेतृत्व स्‍पष्‍ट होते. ऊर्जा सुरक्षा बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, दहशतवाद आणि इतर मुद्द्यांवर भारतासोबत एकत्र काम करण्यास आम्‍ही उत्‍सुक आहोत, असे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले.

भारत आणि कॅनडामधील संबंध का बिघडले होते?

मागील वर्षी कॅनडामध्ये खलिस्‍तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्‍जर याची हत्‍या झाली. कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्‍याचा आरोप केला होता. निज्जर यांच्या कथित हत्येच्या चौकशीशी कॅनडाने भारतीय उच्चायुक्त आणि इतर अधिकार्‍यांशी संबंध जोडला गेला. या आरोपांनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. सर्व आरोप भारताने जोरदारपणे फेटाळून लावला. कॅनडाने उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अधिकार्‍यांना "पर्सन ऑफ इंटरेस्ट" म्हणून घोषित केले. याला सडेतोड प्रत्‍यूत्तर देत भारतानेही ऑक्टोबर २०२४मध्ये भारतातील कॅनडा दूतावासातील सहा अधिकार्‍यांना हद्दपार केले. तसेच आपले उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अधिकार्‍यांना परत बोलवले होते. यामुळे दोन्ही देशांमधील आधीच आणखी बिघडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT