पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकन दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतले. यावेळी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशामध्ये अनेक करार झाले. यामध्ये ट्रम्प यांनी भारताला F35 स्टेल्थ लढाऊ विमान देण्याची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी विक्री वाढवेल आणि त्यांचे प्रशासन भारताला F35 स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यासाठी काम करत आहे.
F35 स्टेल्थ लढाऊ विमान अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिनने बनवले आहे. हे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान आहे. हे जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला बेंगळुरूमधील येलहंका हवाई दल स्टेशनवर झालेल्या एअरो इंडियाच्या १५ व्या आवृत्तीत F-35 लाइटनिंग II लढाऊ विमानाने भाग घेतला.
स्टेल्थ टेक्नॉलॉजी: शत्रूच्या रडारला सहज चकवा देण्याची क्षमता.
मॅक 1.6 वेग: ध्वनीच्या 1.6 पट वेगाने उड्डाण करण्याची क्षमता.
हेल्मेट-माउंटेड डिस्प्ले: पायलटला 360-डिग्री दृश्य देणारी अत्याधुनिक प्रणाली.
मल्टीरोल क्षमता: एअर-टू-एअर, एअर-टू-ग्राउंड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये कार्यक्षम.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रे: हवेत आणि जमिनीवरून हल्ले करण्यासाठी उच्च दर्जाची क्षेपणास्त्रे.
पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, या वर्षापासून आम्ही भारताला लष्करी विक्री अनेक अब्ज डॉलर्सने वाढवू. आम्ही भारताला F35 स्टेल्थ फायटर पुरवण्याचा मार्ग मोकळा करत आहोत. ट्रम्प म्हणाले की त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी ऊर्जेबाबत एक करार केला आहे ज्यामुळे अमेरिका भारताला तेल आणि वायूचा प्रमुख पुरवठादार बनेल. जगभरातील कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका 'कधीही नव्हते' अशा प्रकारे एकत्र काम करतील, असेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक केले. ते म्हणाले की ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझ्यापेक्षा खूप कडक वाटाघाटी करणारे आहेत आणि ते माझ्यापेक्षा खूप चांगले वाटाघाटी करणारे आहेत. इथे स्पर्धा नाही.