India Afghanistan Relations pudhari photo
आंतरराष्ट्रीय

India Afghanistan Relations | तालिबानसोबत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल, जयशंकर यांनी पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी केली चर्चा

India-Pakistan ceasefire | भारताने तालिबान सरकारशी थेट संपर्क साधत अफगाण परराष्ट्रमंत्र्यांशी पहिल्यांदाच चर्चा केली.

मोहन कारंडे

India Afghanistan Relations |

दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानातील तालिबानशासित राजवटीचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्याशी पहिल्यांदा अधिकृत चर्चा केली. जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल मुत्ताकी यांचे आभार मानले. तसेच अफगाणिस्तानच्या भूभागावर क्षेपणास्त्र हल्ले केल्याच्या पाकिस्तानच्या आरोपांबद्दलही भाष्य केले, ज्यामुळे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण झाला होता.

अफगाणिस्तानशी मैत्री!

दूरध्वनीवरून झालेल्या या संवादात जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील लोकांसोबतची भारताची पारंपारिक मैत्री अधोरेखित केली. अफगाणिस्तानमधील विकासाच्या गरजांसाठी भारताकडून सतत पाठिंबा देण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. भारत-अफगाणिस्तानमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील व्यापार, व्हिसा सुविधा आणि चाबहार बंदर, या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

अफगाण विकासासाठी भारताचा पाठिंबा

जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितले, "कार्यवाहक अफगाण परराष्ट्रमंत्र्यांसोबत चांगली चर्चा झाली. पाहलगाम हल्ल्याचा त्यांच्या निषेधाचे मी कौतुक करतो. खोट्या वृत्तांमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांना त्यांनी फेटाळल्याचेही स्वागतार्ह आहे. अफगाण जनतेशी असलेली मैत्री आणि त्यांच्या विकासासाठी भारताचा पाठिंबा कायम राहील."

पहिल्यांदाच तालिबानसोबत चर्चा

भारताने अद्याप तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नसताना, भारत आणि तालिबानमध्ये राजकीय पातळीवर अधिकृत संवाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी मुत्तकी यांची दुबईत भेट घेतली होती. यापूर्वी १९९९-२००० मध्ये कंधार विमान अपहरण घटनेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी तत्कालीन तालिबान परराष्ट्र मंत्री वकील अहमद मुत्तवकिल यांच्याशी चर्चा केली होती. हा संवाद भारताच्या धोरणात्मक राजनैतिकतेचा एक भाग आहे, ज्यामध्ये तालिबानशी थेट संवाद स्थापित करून प्रादेशिक स्थिरता स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अफगाण कैद्यांच्या सुटकेची भारताकडे विनंती

दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चाबहार बंदराचा विकास, अफगाण व्यापारी व रुग्णांसाठी व्हिसा सुलभता, तसेच भारतातील अफगाण कैद्यांच्या मुद्यावरही चर्चा झाली. यासोबतच द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासंबंधीही विचारविनिमय करण्यात आला. मुंबईतील अफगाण वाणिज्य दूतावासाने देखील या चर्चेची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुत्तकी यांनी भारताला प्रमुख प्रादेशिक भागीदार म्हणून संबोधले आहे. भारत-अफगाण संबंधांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत या संबंधांना आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुत्तकी यांनी भारत सरकारकडे अफगाण कैद्यांच्या सुटकेची विनंती केली आणि व्यापारी व रुग्णांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले. यावर उत्तर देताना डॉ. जयशंकर यांनी या मुद्द्यांकडे तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

युद्धात भारतासोबत; अफगाण लोकच भारतीयांचे खरे बहीण-भाऊ

यापूर्वी, निर्वासित अफगाणिस्तानच्या संसदेच्या सदस्या मरियम सोलेमानखिल यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी मदत केल्याबद्दल भारताचे कौतुक केले होते. बुधवारी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सोलेमानखिल म्हणाल्या, "मला वाटते की भारत नेहमीच अफगाणिस्तानचा खरा मित्र राहिला आहे. त्यांनी कोणत्याही युद्धखोरांना पाठिंबा दिलेला नाही. भारताने अफगाणिस्तानच्या लोकांना, अफगाण राष्ट्राला शाळांपासून ते अन्नधान्य, धरणं आणि आरोग्य या क्षेत्रांत पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात आम्ही भारतासोबत उभे आहोत. अफगाण लोक भारतीय लोकांचे खरे बहीण-भाऊ आहेत," अस त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT