लंडन : वृत्तसंस्था
भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला आणि सद्यःस्थितीत ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेला मद्य उद्योजक विजय मल्ल्याने आपल्या कर्जाची परतफेड करण्याचा पुनरुच्चार करण्यासाठी माध्यमाचा आधार घेतला आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) भारतीय करदात्यांचा पैसा ब्रिटनमध्ये खटल्यावर व्यर्थ खर्च करीत असल्याचे त्याने म्हटले आहे.
ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या लंडन बँकेतील 2 लाख 60 हजार पौंड जप्त करण्याचा अंतरिम आदेश रद्द करण्याचा अर्ज काही दिवसांपूर्वी फेटाळला. त्या पार्श्वभूमीवर मल्ल्याने ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली. एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांचा समूह चुकीच्या पद्धतीने ब्रिटनच्या न्यायालयांमध्ये आपल्याविरोधात लढत आहे. ब्रिटनमध्ये एसबीआयचे वकील भारतीय करदात्यांच्या पैशांनी माझ्याविरोधात कायद्याची लढाई लढत आहेत, असे ट्विट मल्ल्याने शुक्रवारी केले.