AI drone beats human Abu Dhabi AI vs human drone race 2025
अबू धाबी : तंत्रज्ञानाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेला क्षण नुकताच अबू धाबी येथे घडला. येथे झालेल्या A2RL x DCL Autonomous Drone Championship स्पर्धेमध्ये नेदरलँडमधील TU Delft विद्यापीठाच्या MavLab संघाने विकसित केलेल्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ड्रोनने जगातील काही नामांकित मानवी ड्रोन वैमानिकांना मागे टाकत थेट शर्यतीत बाजी मारली.
ही थरारक शर्यत ADNEC Marina Hall, Abu Dhabi येथे आयोजित करण्यात आली होती. जगभरातील 14 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दक्षिण कोरिया, मेक्सिको, कॅनडा, तुर्कस्तान, चीन आणि यूएई यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नव्हता. ना कंट्रोलर्स, ना जॉयस्टिक! सर्व ड्रोन पूर्णपणे एआयद्वारे नियंत्रित होते.
सर्व ड्रोनना एकसमान हार्डवेअर देण्यात आले होते. पुढे पाहणारा कॅमेरा, मोशन सेन्सर आणि NVIDIA चा Jetson Orin NX कम्प्युटिंग युनिट.
शर्यतीचा ट्रॅक अत्यंत गुंतागुंतीचा होता. 170 मीटरचा कोर्स, कमी प्रकाशमान वातावरण, वळणदार वाटा आणि कमी व्हिज्युअल मार्गदर्शक अशी आव्हाने स्पर्धेत होती.
या सर्व आव्हानांवर मात करत MavLab च्या एआय ड्रोनने अवघ्या 17 सेकंदांमध्ये दोन फेऱ्या पूर्ण केल्या. या कामगिरीमुळे त्यांनी केवळ AI Grand Challenge जिंकलेच नाही, तर DCL Falcon Cup मधून पात्र ठरलेल्या प्रोफेशनल मानवी वैमानिकावर थेट विजय मिळवला.
ही स्पर्धा केवळ स्पर्धा नव्हती, तर तंत्रज्ञानाच्या भविष्याची झलक होती. एआय ड्रोनने प्रत्यक्षात मानव वैमानिकाला पराभूत करून दाखवले आणि त्यामुळे ही घटना संपूर्ण तंत्रज्ञान विश्वामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
या स्पर्धेमध्ये ड्रॅग रेस व मल्टी-ड्रोन रेससुद्धा घेण्यात आल्या. TII Racing आणि MavLab या संघांनी विविध प्रकारांमध्ये उल्लेखनीय विजय मिळवले. यासोबतच 100 हून अधिक इमिराती विद्यार्थ्यांना ड्रोन ऑपरेशन आणि स्टेम शिक्षण देणारा विशेष कार्यक्रमही पार पडला.
या ऐतिहासिक स्पर्धेनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे A2RL च्या पुढील मोठ्या प्रोजेक्टकडे. यात स्वयंचलित सेल्फ-ड्रायव्हिंग कार रेसिंग सिरीज जी 2025 च्या उत्तरार्धात Yas Marina Circuit येथे होणार आहे.