Islamabad Long March | इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादवर ‘लाँग मार्च’ Maaz Awan
आंतरराष्ट्रीय

Islamabad Long March | इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादवर ‘लाँग मार्च’

पुढारी वृत्तसेवा

पेशावर/लक्की मारवत; वृत्तसंस्था : तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पक्षाने इस्लामाबादच्या दिशेने भव्य ‘लाँग मार्च’ सुरू केला आहे. खैबर पख्तूनख्वाचे (केपी) मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी रविवारी लक्की मारवत येथील गांडी चौकातून या मोर्चाचे नेतृत्व करत केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पख्तून आणि केपी जनतेच्या हिताविरोधातील कोणतीही धोरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आफ्रिदी यांनी दिला.

बंद दारांआड चर्चा उधळल्याचा आरोप

उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री आफ्रिदी म्हणाले की, राजकीय तणाव कमी करण्यासाठी पक्षाची समिती इस्लामाबादला गेली होती; मात्र बंद दाराआड निर्णय घेणाऱ्यांनी चर्चा उधळून लावली. गेल्या २२ वर्षांपासून दहशतवादाची समस्या कायम असल्याचा दाखला देत त्यांनी लष्करी कारवाईच्या धोरणावर टीका केली. इम्रान खान यांच्या धोरणांची अंमलबजावणी झाल्यास १०० दिवसांत शांतता प्रस्थापित करू, असा दावाही त्यांनी केला.

सरकारी हेलिकॉप्टरच्या वापरावर वाद

दरम्यान, राजकीय मोर्चासाठी सरकारी हेलिकॉप्टर वापरल्याबद्दल केंद्रीय माहिती मंत्री अताउल्ला तरार आणि केपीचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी आफ्रिदींवर सडकून टीका केली. हा न्यायालयाच्या आदेशांचा थेट अवमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

गांडापूर यांचा ताफा परत फिरला

डेरा इस्माईल खान येथून निघालेला माजी मुख्यमंत्री अली अमीन गांडापूर यांचा ताफा रस्ते बंद असल्याने आणि कलम १४४ लागू असल्याने यारिक येथून मागे फिरला. कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि हिंसाचार टाळण्यासाठी हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे गांडापूर यांनी स्पष्ट केले.

कडेकोट सुरक्षा आणि पुढील दिशा

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण वजीरिस्तान, टांक, डीआय खान आणि हांगूसह अनेक जिल्ह्यांत सुरक्षेच्या कारणास्तव कलम १४४ अंतर्गत वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. हा मोर्चा करक, कोहात आणि पेशावर मार्गे ८ ऑक्टोबरला खैराबाद येथे पोहोचेल आणि तेथून इस्लामाबाद प्रवेशाची पुढील रणनीती जाहीर केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT