वॉशिंग्टन : आपल्याला वृद्धत्व येऊ नये आणि त्वचा तुकतुकीत राहावी, असे बहुतांश जणांना आणि जणींना वाटते. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील स्वयंघोषित ‘ह्युमन बार्बी’ने स्वतःसाठी मुलाचे रक्त चढविण्याचे ठरवले आहे. सध्या या महिलेचे वय 47 आहे. तरुण दिसण्यासाठी तिने आतापर्यंत तब्बल लाख डॉलर खर्च केले आहेत. या महिलेचे नाव मार्सेला इग्लेसियास असे असून, तिचा तेवीस वर्षीय मुलगा रॉड्रिगो याने आपल्या मातेला रक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अपत्याकडून रक्त मिळते, तेव्हा त्याचा लाभ निश्चितच होतो, असा दावा मार्सेला यांनी केला आहे. रॉड्रिगो यालासुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल प्रचंड उत्सुकता वाटू लागली आहे. विशेष म्हणजे, तो आपल्या आजीलाही स्वतःचे रक्त देण्यास तयार आहे. मार्सेला यांनी सध्या ही योजना पार पाडण्यासाठी सक्षम डॉक्टरचा शोध सुरू केला आहे. या नव्या थेरपीचा फायदा या महिलेला कितपत होणार, हे अजून अर्थातच गुलदस्त्यात आहे. मात्र, यातून मार्सेला यांनी सार्या अमेरिकेचे लक्ष वेधून घेतले आहे, यात शंका नाही.