पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीमध्ये पाकिस्तानी युवतीच्या ऑनर किलिंग प्रकरणी न्यायालयाने तिच्या पालकांसह नातेवाईकांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली असल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी पालकांनी आपल्याच मुलीची केलेली हत्या प्रकरण इटलीमध्ये बहुचर्चित ठरले होते. ( Honor Killing Case)
समन अब्बास किशोरवयीन असताना पाकिस्तानातून इटलीच्या उत्तरेकडील एमिलिया-रोमाग्ना येथील नोव्हेलरा या फार्म टाउनमध्ये स्थलांतरित झाली होती. 30 एप्रिल 2021 रोजी समन कोणालाच भेटली नाही. काही दिवसांनी तिचे आई-वडील इटली सोडून पाकिस्तानला परत गेले. 2022 मध्ये तिचा मृतदेह एका फार्महाऊसमधून सापडला. यानंतर समनची हत्या झाल्याचे उघड झाले.
समन अब्बासच्या पालकांनी तिचे नातेवाईक असणार्या तरुणाशी लग्न निश्चित केले होते. मात्र तिने लग्न करण्यास नकार दिला. सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये तिने आपल्या प्रियकराबरोबरचा फोटो शेअर केला होता. तसेच पाकिस्तानात जबरदस्तीने लग्न होईल. लग्नास नकार दिला तर आपली हत्या होवू शकते, असे तिने प्रियकराला सांगितले होते. समनचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. ऑनर किलिंग प्रकरणी बोलोग्ना शहरातील अपील न्यायालयाने समनचे वडील शब्बीर अब्बास, आई नाझिया शाहीन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर काका दानिश हसनैन यांना 22 वर्षे कारावासाची तसेच कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी निर्दोष मुक्त केलेल्या दोन चुलत भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इटलीमध्ये लग्नासाठी जबरदस्ती करणे हा घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा आहे. अब्बास बेपत्ता झाल्यानंतर इटलीच्या इस्लामिक समुदायांच्या संघटनेने जबरदस्तीने विवाह करण्यास नकार देणारा धार्मिक निर्णय जारी केला होता.
समनची हत्या करुन तिचे आई आणि वडिलांनी पाकिस्तानला पलायन केले हाेते. या प्रकरणाची इटली सरकारने गंभीर दखल घेतली. समनच्या वडिलांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. खटल्यासाठी इटलीला प्रत्यार्पण करण्यात आले होते. तिच्या आईला अनुपस्थितीत दोषी ठरवण्यात आले; परंतु तीन वर्षे फरार राहिल्यानंतर मे 2024 मध्ये तिला अटक करण्यात आली होती.