पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलने मध्य बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता मोहम्मद अफिफ ठार झाल्याचे वृत्त 'अल जजिरा'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. ( Israeli strike in central Beirut)
इस्त्रायलने आज (दि.१७) सीरियन बाथ पार्टीच्या लेबनीज शाखेला लक्ष्य केले. हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रवक्ता मोहम्मद अफिफसह अन्य तीन जण ठार झाले आहेत. या हल्ल्याचा फटका बेरूतच्या दक्षिणी उपनगरातून विस्थापित झालेले परिसरातलाही बसला आहे. अफिफ हा हिजबुल्लाचा मुख्य प्रवक्ता होता. इराण समर्थित हिजबुल्ला संघटनेच्या मीडिया संबंध कार्यालयाचा ताबा घेण्यापूर्वी त्याने अल-मनार टेलिव्हिजनवर अनेक वर्षे काम केले होते.
बाथ पार्टीच्या लेबनीज शाखेचे सरचिटणीस अली हिजाझी यांनी अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अफिफ अनेक वर्षांपासून हिजबुल्लाच्या माध्यमांशी संबंधित होता. तो स्थानिक आणि परदेशी माध्यम प्रतिनिधींना नाव गुप्त ठेवत माहिती पुरवत होता. हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसराल्लाहची सप्टेंबरमध्ये खात्मा करण्यात इस्त्रायला यश आले. तेव्हापासून अफिफने बेरूतच्या दक्षिण उपनगरात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. गेल्या महिन्यात अशाच एका कार्यक्रमात अफिफने हिजबुल्लाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू निवासस्थानाला लक्ष्य करत ड्रोन सोडल्याची माहिती माध्यमांना दिली होती.