वुजिन; वृत्तसंस्था : चीनमधील वुजिन शहरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या अपघातात हेलिकॉप्टर शेतात कोसळून दोन तुकड्यांत विभागले गेले. मात्र, अपघातानंतरही त्याचे रोटर ब्लेड बराच वेळ वेगाने फिरत राहिल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाला.
कॉकपिटमध्ये अडकलेले पायलट आणि त्याचा सहकारी हेलिकॉप्टरमध्ये इकडे-तिकडे फेकले जात होते. त्यापैकी एकजण दारातून अर्धा बाहेर लटकलेला होता. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीट बेल्टमुळे दोघांचेही प्राण वाचल्याचे सांगण्यात आले. एका जखमीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, दुसऱ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.