पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील उमेदवारांमधील दुसरे प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि .डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हरिस यांच्यात चांगलीच जुंपली. दोन्ही उमेदवारांनी आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी एकमेकांवर आरोपांच्या फैर्या झाडत जोरकसपणे आपली बाजू मांडली. आपणच कसे राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य आहोत हे मांडण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांनी केला.
एबीसी न्यूज अँकर डेव्हिड मुइर आणि लिनसे डेव्हिस यांनी या वादाचे आयोजन केले होते. हा वादविवादाचा कार्यक्रम अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येनं टीव्हीवर पाहतात.फिलाडेल्फिया येथील नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटरमध्ये आज भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता चर्चेला सुरुवात झाली.कमला हॅरिस यांनी ३७ मिनिटे ३६ सेकंदात आपली भूमिका मांडली. तर ट्रम्प यांनी ४२ मिनिटे ५२सेकंदात आपले मत व्यक्त केले. या निवडणुकीत ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात पहिला आणि शेवटचा वादविवाद होता.आज (दि. ११ सप्टेंबर) ९० मिनिटे झालेल्या वादविवादामध्ये अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, हिंसाचार आदी प्रमुख सहा मुद्द्यांवर दोघांनी चर्चा केली. या वादविवादाकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधले होते.
आज झालेल्या वादविवादावेळी ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर २४ तासांच्या आत रशिया-युक्रेन युद्ध थांबवू. त्याला उत्तर देताना कमला हॅरिस म्हणाल्या की, तुम्ही राष्ट्राध्यक्ष असता तर पुतिन सध्या कीवमध्ये बसून तुम्हाला घेवून जेवत बसले असते.
या वेळी ट्रम्प यांनी अमेरिकेतील वाढत्या महागाईवर बोट ठेवले. महागाई देशाच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हॅरिस यांनी ट्रम्प यांनी चीनला अमेरिकन चिप्स विकून देशाचे अतोनात नुकसान केले. कमला हॅरिस इस्रायलचा तसेच या भागातील अरब लोकसंख्येचा द्वेष करतात, असा आरोप ट्रम्प यांनी केला यावर हॅरिस यांनी इस्रायलला पाठिंबा देण्यावर भर दिला. तसेच ट्रम्प हे वांशिक मुद्द्यांवरून देशवासियांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
कमला यांनी पहिल्यांदाच अध्यक्षीय निवडणुकीच्या चर्चेत भाग घेतला हाेता. तर ट्रम्प यांनी 2016-24 या कालावधीत पाचवेळा वादविवाद कार्यक्रमात भाग घेतला आहे.यंदाच्या निवडणुकीत २७ जून रोजी ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या प्रथम वादविवाद झाला होता. यानंतर बायडेन यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली होती. यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली होती.