तेलअविव : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा सर्वोच्च राजकीय नेता सलाह अल-बर्दावील आणि त्याची पत्नी ठार झाले असून रविवारी सकाळी हमासने या घटनेला दुजोरा दिला. दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात हा हल्ला झाला. गेल्या आठवड्यात मंगळवारी इस्रायलने युद्धबंदीचा भंग केला आणि गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केले. यामध्ये सुमारे 600 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा शहरातील तीन भागांवर नवीन हल्ल्यांची योजना आखत असून तेथून पॅलेस्टिनींना निघून जाण्याचा इशारा दिला असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.
हमासच्या ताब्यातील 59 ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्रायलने गाझामध्ये हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या ओलिसांपैकी 24 जण जिवंत आहेत. यापूर्वी 19 जानेवारी रोजी दोघांमध्ये युद्धबंदी झाली होती. यामध्ये, ओलिसांच्या सुटकेसाठी एक करार करण्यात आला. शनिवारी रात्री इस्रायलने लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमधून डागलेल्या रॉकेटच्या प्रत्युत्तरात इस्रायलने हा हल्ला केला. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिजबुल्लाहसोबतच्या युद्धबंदी नंतर इस्रायलचा हा पहिलाच मोठा हल्ला होता. हिजबुल्लाहने एक निवेदन केले असून इस्रायलवर रॉकेट डागले नाहीत आणि आम्ही युद्धबंदीचे पालन करत असल्याचे म्हटले आहे, तर लेबनीज सीमेजवळील मेतुला शहरातून सहा रॉकेट डागण्यात आले. यापैकी 3 इस्रायलमध्ये घुसले आणि हवेतच नष्ट झाल्याचे सांगत हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही; परंतु त्यांनी हिजबुल्लाह कमांड सेंटर आणि डझनभर रॉकेट लाँचर्सना लक्ष्य केले असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लष्कराला लेबनॉनमध्ये प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे.
युक्रेनी शह झापोरिझियावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तिघा युक्रेनी नागरिकांचा मृत्यू तर 12 जखमी झाले आहेत. रशियाने निवासी इमारती, मोटारी आणि अपार्टमेंटवर हल्ले केल्याचे युक्रेनने सांगितले. इमारतींच्या ढिगार्यांतील मृतदेह शोधले जात आहेत.