पुढारी ऑनलाईन डेस्क : मृत्यू हा अटळच. जगण्यातील अंतिम सत्यही. गेली दीड वर्ष मृत्यूला सोबतच तिचे रोजच जगणं सुरु होतं. या काळात गाझामधील युद्धाची भयावह दृश्य ती कॅमेराबद्ध करुन जगासमोर आणत होती. त्याचबरोबर सर्वसामान्यांचे उद्ध्वस्त झालेले जीवन जगाला सांगण्यासाठीही ती वचनबद्ध होती. काही दिवसांपूर्वीचे तिने आपली अंतिम इच्छाही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. दुर्दैवाने तिची अंतिम इच्छा 'ब्रेकिंग न्यूज' झाली. गाझामधील युद्धाचे प्रत्येक दृश्य दीड वर्ष आपल्या कॅमेऱ्यात टिपणारी २५ वर्षीय पत्रकार फातिमा हसौना हवाई हल्ल्यात ठार झाली. या हल्ल्यात फातिमासोबत तिच्या १० नातेवाईकांचाही मृत्यू झाला असल्याचे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे.
गाझाही मागील दीड वर्षापासून युद्धभूमी बनली आहे. इस्त्रायल आणि हमाच्या संघर्षात या परिसराच्या अक्षरक्ष: चिंधडया उडाल्या आहेत. येथील धोक्यांची जाणीव असूनही फातिमाने तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टी तिच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या. गाझीची कहाणी जगाला सांगण्यासाठी वचनबद्ध राहिली.
फातिमाने गेल्या १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ तिने युद्ध, हवाई हल्ले, स्वतःच्या घराची उद्ध्वस्तता, सततचे विस्थापन आणि आपल्या ११ नातेवाइकांच्या मृत्यूचे दस्तावेज सादर केले होते. तिने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, " मला एक गौरवशाली मृत्यू हवा आहे. मला फक्त ब्रेकिंग न्यूज किंवा समूहातील एक नंबर बनायचे नाही. मला असा मृत्यू हवा आहे, जो जगाला ऐकू येईल. याचा प्रभाव काळानुसार टिकेल. मला अशी प्रतिमा हवी आहे जी काळ किंवा जागेने दफन केली जाऊ शकत नाही."
फातिमाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले होते. २५ वर्षांची फातिमा हस्सुना उत्तर गाझामधील त्यांच्या घरावर झालेल्या इजरायली हवाई हल्ल्यात ठार झाली. त्यांच्या गर्भवती बहिणीसह कुटुंबातील आणखी १० सदस्यही या हल्ल्यात ठार झाले. इजरायली लष्कराने सांगितले की हा हल्ला हमासच्या सदस्याचा खात्मा करण्यासाठी करण्यात आला होता.
या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, इस्रायली सैनिक आणि नागरिकांवर हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या हमास सदस्याला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. फातिमाच्या मृत्यूच्या २४ तास आधी घोषणा करण्यात आली होती की इस्रायली हल्ल्यादरम्यान गाझामधील फातिमा हसौनाच्या जीवनावर आधारित चित्रपट कान्ससोबत आयोजित फ्रेंच स्वतंत्र चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे. फातिमा हवाई हल्ल्यात ठार होण्याच्या २४ तास आधीच तिच्या जीवनावर आधारित एक माहितीपट फ्रान्समधील कान्स फिल्म महोत्सवाच्या समांतर चालणाऱ्या एका स्वातंत्र्य महोत्सवात दाखवला जाणार असल्याची घोषणा झाली होती. इराणी दिग्दर्शक सेपिदेह फारसी यांनी तयार केलेला "Put Your Soul on Your Hand and Walk" हा माहितीपट गाझामधील लोकांचे दुःख आणि हस्सुना व फारसी यांच्यातील व्हिडीओ संवादांमधून त्यांच्या रोजच्या जीवनाची कहाणी सांगतो.
गाझामधीलच पत्रकार मिकदाद जमील यांनी जनतेला आवाहन केलं “ तिचे फोटो बघा, तिचे शब्द वाचा—गाझाचं जीवन, युद्धातील मुलांचं दुःख तिच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुभवा.”त्यांच्या मृत्यूनंतर Cannes Acid फिल्म फेस्टिव्हलने एका निवेदनात सांगितलं, “आम्ही एक असा चित्रपट पाहिला, जिथे त्या तरुणीचा जीवनसत्त्वत्स्फूर्त ठसा एखाद्या चमत्कारासारखा वाटतो. तिचं हास्य आणि चिकाटी जादूई होती. ती साक्षीदार होती, फोटो घेत होती, बाँब असूनही अन्न वाटत होती, दुःख सहन करत होती, उपाशी होती. तिच्या प्रत्येक दर्शनाने आम्हाला आनंद झाला, पण तिच्या सुरक्षिततेची भीतीही वाटली.”
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर संघर्ष सुरू झाला. यामध्ये आतापर्यंत ५१,००० हून अधिक लोक ठार झाले आहे. बळी पडलेल्यांमध्ये बहुतेक महिला आणि मुले आहेत. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर इस्रायलने पुन्हा हवाई हल्ले वाढवले आहेत. शुक्रवारी झालेल्या हवाई हल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.