इस्रायल संरक्षण दलाने गुरुवारी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येची पुष्टी केली आहे. (Image source- Israel Defense Force)
आंतरराष्ट्रीय

'इस्रायल'चा आणखी एक एअर स्ट्राईक, हमास सरकारच्या प्रमुखासह ३ नेते ठार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

इस्रायल संरक्षण दलाने (IDF) गुरुवारी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या हत्येची पुष्टी केली. यात गाझा सरकारचा प्रमुख रावही मुश्ताहा (Rawhi Mushtaha) यांचा समावेश आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती देताना आयडीएफने सांगितले की उत्तर गाझामधील भूमिगत कंपाऊंडवर केलेल्या हल्ल्यात रावही मुश्ताहा याच्यासह समेह सिराज आणि समेह ओदेह हे दोन हमास कमांडर ठार झाले. यावर हमासने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रावही मुश्ताहा हा गाझामधील हमास सरकारचा प्रमुख होता. समेह अल-सिराज हा हमासच्या राजकीय ब्युरो होता. तो हमासच्या कामगार समितीची सुरक्षा सांभाळत होता. तर सामी ओदेह हा हमासच्या सर्वसाधारण सुरक्षा यंत्रणेचा कमांडर होता, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने X वरील पोस्टमधून दिली आहे.

Israel-Hamas war : तिघे भूमिगत कंपाऊंडमध्ये लपले होते

हे तिघे उत्तर गाझामधील एका मजबूत अशा भूमिगत कंपाऊंडमध्ये लपून बसले होते. यादरम्यान इस्रायल हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांना ठार केले. इस्रायलचे संरक्षण दल ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा माग काढणे सुरुच ठेवेल आणि जे कोणी इस्रायलला धमकावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.

मुश्ताहा ७ ऑक्टोबर हल्ल्याचा मास्टरमाईंड

मुश्ताहा हा हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवार याचा जवळचा सहकारी होता. तो ७ ऑक्टोबर रोजीच्या इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात १,२०० लोक मारले गेले होते. या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू झाले होते. गेल्या आठवड्यात लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायलने अचूक हल्ला करत हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह याला ठार केले होते. यामुळे इराण समर्थित दहशतवादी गटाला मोठा धक्का बसला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT