बीजिंग; वृत्तसंस्था : उत्तर चीनमधील शानक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात किमान 90 कामगारांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 17 वर्षांतील ही चीनमधील सर्वात मोठी खाण दुर्घटना मानली जात आहे. सिनुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किनयुआन काऊंटीमधील लियुशेन्यू कोळसा खाणीत शुक्रवारी संध्याकाळी 7.29 वाजता हा स्फोट झाला. दुर्घटना घडली तेव्हा खाणीच्या आत 247 कामगार जमिनीखाली काम करत होते.
अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र खाणीतील कार्बन मोनॉक्साईड (अतिशय विषारी आणि गंधहीन वायू) सेन्सर ट्रिगर झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळाली. एका जखमी कामगाराने सांगितले की, स्फोटानंतर अचानक धूर आणि गंधकाचा वास आला. त्यामुळे अनेक लोक गुदमरले.
* किमान 123 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 755 अपत्कालीन आणि वैद्यकीय कर्मचारी बचावकार्यात गुंतले आहेत.
* चीनच्या शानक्सी प्रांतातील कोळसा खाणीत झालेल्या गॅस स्फोटात 90 जणांचा मृत्यू झाला, तर 123 जण जखमी झाले.
* ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली, ज्यावेळी जमिनीखाली 247 कामगार काम करत होते.
* राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचावकार्यात कोणतीही कसर न सोडण्याचे आणि सुरक्षेचे नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत.