Bangladesh Workers Protest | बांगला देशात कामगारांचा उद्रेक; महामार्ग रोखून वाहनांची जाळपोळ  
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Workers Protest | बांगला देशात कामगारांचा उद्रेक; महामार्ग रोखून वाहनांची जाळपोळ

पोलिसांशी संघर्ष; किमान वेतन अडीच पट करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ढाका; वृत्तसंस्था : किमान वेतन अडीच पट वाढवून देण्याच्या मागणीसाठी बांगला देशातील वस्त्रोद्योग कामगारांनी आंदोलन तीव्र केले आहे. सोमवारी विविध ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला. कामगारांनी महामार्ग रोखून धरले, तर काही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचे फवारे मारले. या आंदोलनामुळे ढाका, गाझीपूर आणि मयमनसिंह परिसरातील सुमारे ६७० कारखाने बंद राहिले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गाझीपूरच्या औद्योगिक भागातून जाणारा ढाका-टांगाइल महामार्ग आंदोलकांनी रोखला. यावेळी पोलिसांच्या तीन व्हॅनसह अनेक वाहनांना आग लावण्यात आली. ढाका ते नारायणगंज मार्गावरही वाहतूक अडवून टायर जाळण्यात आले. या घटनांमध्ये बॉर्डर गार्ड बांगला देशचे (बीजीबी) किमान दोन जवान आणि अनेक नागरिक जखमी झाले. सोमवारी गाझीपूर जिल्ह्यातील १५० हून अधिक कारखान्यांचे कामकाज बंद होते.

गेल्या दोन दिवसांतील तोडफोड आणि हिंसाचाराच्या आरोपांवरून ढाका महानगर पोलिसांनी किमान १४ कामगार तसेच अवामी लीगचे काही नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. रविवारीही आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यात सुमारे ५० जण जखमी झाले होते. कामगारांची मागणी किमान मासिक वेतन ९,६०० टकांवरून २३ हजार टकांपर्यंत वाढवण्याची आहे. सरकारने रविवारी वेतन निश्चित करण्यासाठी वेतन मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरूच आहे.

अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार

बांगला देशच्या वस्त्रोद्योगात ४० लाखांहून अधिक लोक काम करतात. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये या उद्योगाचा वाटा ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

पंतप्रधानांची तातडीची बैठक

पंतप्रधान तारिक रहमान यांनी रविवारी संध्याकाळी मंत्री आणि सल्लागारांची तातडीची बैठक बोलावली होती. कारखाने सुरू ठेवण्याबरोबरच कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वस्त्रोद्योगातील निर्यातीवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्यासही सांगितले.

गृहमंत्र्यांचा शेख हसिनांवर आरोप

गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी या हिंसाचारामागे माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या अवामी लीगशी संबंधित काही कारखानदार असल्याचा आरोप केला आहे. हे कारखानदार आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी चिथावणी देत असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT