Ganga Aarti London | लंडनमध्ये प्रथमच थेम्स नदीकाठी गंगा आरती -
आंतरराष्ट्रीय

Ganga Aarti London | लंडनमध्ये प्रथमच थेम्स नदीकाठी गंगा आरती

हजारो भाविकांची उपस्थिती; भजन, मंत्रोच्चार, दीपांनी सजला किनारा

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : लंडनमधील थेम्स नदीच्या किनारी रविवारी प्रथमच गंगा आरती झाली. अनोख्या सोहळ्यासाठी हजारो नागरिक आणि भाविक उपस्थित होते. भजन, मंत्रोच्चार आणि संगीताच्या वातावरणात झालेल्या आरतीमुळे थेम्सच्या किनाऱ्यावर जणू वाराणसीच्या घाटांची झलक पाहायला मिळाली.

ही गंगा आरती चिन्मय मिशन यूकेने ‘टोटली थेम्स फेस्टिव्हल’च्या सहकार्याने आयोजित केली होती. चिन्मय मिशनच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा भाग म्हणून हा कार्यक्रम झाला. नदी, निसर्ग आणि जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. भजन, मंत्रोच्चार आणि विविध सांस्कृतिक-संगीत कार्यक्रम झाले. भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने नागरिकांनी आरतीमध्ये सहभाग घेत दीप प्रज्वलित केले. चिन्मय मिशनची स्थापना १९५१ मध्ये झाली. या संस्थेची जगभरात ३५० हून अधिक केंद्रे आहेत.

दिवे, पूजेचे साहित्य नदीत सोडले नाही...

या आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक विधी पार पाडतानाही थेम्स नदीचे प्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. आरतीदरम्यान प्रज्वलित केलेले दिवे नदीत सोडण्यात आले नाही. ते नदीच्या काठावरच ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे फुले किंवा अन्य पूजासाहित्यही नदीत विसर्जित करण्यात आले नाही. कार्यक्रमात कचरा कमी करण्याबरोबरच सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यावरही भर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT