सुनील काळे, मुक्त पत्रकार
जोहान्सबर्ग: जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या जी २० शिखर परिषदेपूर्वी सलग पाच दिवसांच्या चर्चेनंतर जी २० शेरपांनी शुक्रवारी नेत्यांच्या घोषणापत्रावर सहमती दर्शवली. शनिवारी नासरेक इथं जी २० शिखर परिषद होणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या १९ देशांचे प्रमुख नेते आणि ५० हून जास्त देशांचे प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी २० शिखर परिषदेच्या घोषणापत्रावर अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि रशिया यांसारख्या काही देशांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे घोषणापत्रातील काही मुद्द्यांची भाषा सौम्य केली जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या सहभागावर गोंधळ
जी २० शिखर परिषदेमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच घेतला आहे. पण शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला अमेरिकेच्या अचानक आलेल्या विनंतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेने कार्यवाहक राजदूत मार्क डिलार्ड यांनी फक्त अध्यक्षपद हस्तांतरण समारंभात सहभागी होऊ द्यावे अशी विनंती केली आहे. कारण अमेरिका पुढच्या वर्षी जी 20 अध्यक्षपद स्वीकारणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी कार्यवाहक राजदूताला अध्यक्षपद हस्तांतर देण्यास नकार देत ही गोष्ट प्रोटोकॉलला धरून नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं जी २० चे अध्यक्षपद अमेरिका कसं स्वीकारणार याबाबत संशय निर्माण होत आहे.
अमेरिकेच्या भूमिकेवर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी आक्षेप घेत अमेरिकेशिवाय ही परिषद यशस्वी केली जाईल असा दावा केला आहे. व्हाईट हाऊसनं मात्र अमेरिकेची भूमिका बदलली नसल्याचं सांगत रामाफोसा यांनी सांभाळून बोलावं असा सल्ला दिला आहे.
परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात
२२ आणि २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी सर्व देशांचे प्रतिनिधी जोहान्सबर्गमध्ये पोहोचत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्राजील, युके, कँनडा, सौदी अरेबिया, चीन या देशांचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीत सहभागी होतील. दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसनशील देशात ही परिषद होत असताना भारताकडून दक्षिण आफ्रिकेला मोठ्या अपेक्षा आहेत. जी २० भारतात २०२३ मध्ये झाली होती. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच आफ्रिकन संघालाकायमस्वरुपी सदस्य बनवण्यात आले होते. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेत होणारी ही परिषद भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी भाविनकदृष्ट्या खास बनवते. दक्षिण आफ्रिकेतली जी २० शिखर परिषद एकता, समानता, शाश्वतता” या थीमवर आधारित आहे. यात जगभरातल्या ८५ टक्के हिस्सा असलेले देश सहभागी होणार आहेत.