जोहान्सबर्ग; वृत्तसंस्था : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त घोषणापत्राला मंजुरी दिल्याचे जाहीर करत, दक्षिण आफ्रिकेने शनिवारी आपल्या जी-20 शिखर परिषदेच्या योजना पुढे नेल्या. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, महिन्यांच्या वाटाघाटींनंतर एक अंतिम दस्तऐवज तयार झाला असून तो पुन्हा चर्चेसाठी खुला केला जाणार नाही.
त्यावर पुन्हा वाटाघाटी होऊ शकत नाहीत. हे घोषणापत्र स्वीकारण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केले आणि गेल्या आठवड्यात तर खूपच वेगाने काम झाले, असे प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकेचा हा बहिष्कार, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय बहुसंख्य सरकार श्वेत नागरिकांसोबत भेदभाव करत असल्याच्या दाव्यांवर आधारित होता. हे आरोप दक्षिण आफ्रिकेने फेटाळले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले आहेत. या बहिष्कारामुळे आफ्रिकन भूमीवर प्रथमच आयोजित झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या सुरुवातीवर सावट पसरले होते. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या अनुपस्थितीचा करारापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांवर कोणताही परिणाम होणार नाही.
यजमान देशाचा विकसनशील राष्ट्रांना हवामान संबंधित आपत्तींशी जुळवून घेण्यास मदत करणे, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार करणे आणि कर्जाचा खर्च कमी करणे यावरचा भर ट्रम्प यांनी नाकारला होता. यामुळे अमेरिकेने अंतिम निवेदनात हवामान किंवा नवीकरणीय ऊर्जेवरील कोणताही उल्लेख समाविष्ट करण्यास आक्षेप घेतला होता. इतर अनेक जी-20 सदस्य देशही पारंपरिकपणे हवामानाबाबत सौम्य भाषा पसंत करतात, ज्यामुळे एकमत कसे साधले गेले यावर प्रश्न निर्माण झाले होते.
दक्षिण आफ्रिकेतील जी-20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी एका संभाषणादरम्यान मनमोकळेपणाने हसताना दिसल्या. शनिवारी जोहान्सबर्गमध्ये जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या हलक्या-फुलक्या गप्पांमधून लक्ष वेधून घेतले. दोन्ही नेते हसताना, हस्तांदोलन करताना आणि एकमेकांना शुभेच्छा देताना एका सहज आणि मनमोकळ्या क्षणी दिसले. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आपुलकीने मिठी मारतानाही दिसले.