क्वॉलालंपूर; पीटीआय : अमेरिकेच्या द़ृष्टिकोनातून राजनैतिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश पाकिस्तानसोबत सामरिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असला तरी, हे संबंध भारतासोबतच्या संबंधांना धक्का लावून प्रस्थापित केले जाणार नाहीत.
याला परिपक्व आणि व्यावहारिक परराष्ट्र धोरण म्हणत रुबिओ यांनी अधोरेखित केले की, भारताचेही अशा देशांशी संबंध आहेत ज्यांच्याशी अमेरिकेचे संबंध चांगले नाहीत. ‘हेच दुसर्या बाजूलाही लागू होते,’ असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील सर्वोच्च अधिकार्यांपैकी एक असलेल्या रुबिओ यांनी शनिवारी दोहाला जाणार्या विमानात पत्रकारांना सांगितले. ट्रम्प यांच्या पूर्वेकडील देशांच्या दौर्याचा हा एक भाग आहे. ‘मला वाटत नाही की आम्ही पाकिस्तानसोबत जे काही करत आहोत, त्याचा परिणाम भारतासोबतच्या आमच्या मैत्रीवर किंवा संबंधांवर होईल. भारतासोबतचे आमचे संबंध खूप खोल, ऐतिहासिक आणि महत्त्वाचे आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
रुबिओ सोमवारी आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी आणि रशियन तेलाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला असतानाच, त्यांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याचे संकेत दिले. क्वालालंपूर येथे असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स च्या शिखर परिषदेत ट्रम्प यांच्या आगमनानंतर लगेचच कंबोडिया-थायलंड करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
रुबिओ यांनी दावा केला की, भारतासोबत कोणताही संघर्ष सुरू होण्यापूर्वीच त्यांनी इस्लामाबादशी संपर्क साधला होता. ते म्हणाले की, ट्रम्प प्रशासन ‘एक युती, एक सामरिक भागीदारी पुन्हा तयार करण्यास इच्छुक आहे.’ आम्हाला भारतासोबतच्या आव्हानांची आणि इतर सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव आहे; परंतु शक्य असेल तिथे देशांसोबत भागीदारीच्या संधी निर्माण करणे हे आमचे काम आहे.