ढाका : बांगला देशात डिसेंबर महिन्यात चार हिंदू नागरिकांच्या निर्घृण हत्येमुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत कोणाचा गळा चिरला गेला, कोणाला जमावाने मारहाण करून ठार केले, तर कोणाचा मृतदेह भररस्त्यात टांगून दहशतीचा संदेश देण्यात आला.
या महिन्यात बळी ठरलेले हिंदू
नागरिक : जोगेश चंद्र रॉय व सुबर्णा रॉय (7 डिसेंबर) : 75 वर्षीय जोगेश चंद्र रॉय आणि 60 वर्षीय सुबर्णा रॉय यांची 7 डिसेंबर रोजी त्यांच्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. हे दाम्पत्य बांगला देशातील रंगपूर येथे राहात होते. जोगेश चंद्र रॉय हे स्वातंत्र्यसैनिक होते.
दीपू दास (18 डिसेंबर) :18 डिसेंबर रोजी मैमनसिंग येथे दीपू दास यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप लावून एका उन्मादी जमावाने त्यांना फॅक्टरीतून ओढत बाहेर नेले आणि ठार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह भर रस्त्यात गळफास देऊन लटकवण्यात आला. जमावाने मृतदेहाला जोडे-चपलांनी मारहाण केली आणि शेवटी पेटवून दिले.
अमृत मंडल (25 डिसेंबर) : ताजा प्रकार राजबारी जिल्ह्यात घडला असून 24 डिसेंबर रोजी रात्री अमृत मंडल यांच्यावर जमावाने भीषण हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 25 डिसेंबर रोजी रात्री 2 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.