Jimmy Carter death | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन file photo
आंतरराष्ट्रीय

Jimmy Carter Death | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

भारताशी खास नातं; एका गावाला दिले आहे कार्टर यांचे नाव

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (Jimmy Carter) यांचे रविवारी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. ते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष होते. कार्टर यांचे हरियाणातील एका गावाशी खास नाते आहे. भारत भेटीवर आले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ या गावाला कार्टरपुरी असे नाव दिले आहे.

१९७७ मध्ये आर. फोर्ड यांचा पराभव करून जिमी कार्टर राष्ट्राध्यक्ष झाले. डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. १९७७ ते १९८१ पर्यंत कार्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. २००२ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. या काळात त्यांनी अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील संबंधांचा पाया घातला. कार्टर यांचा जन्म 1 ऑक्टोबर १९२४ रोजी झाला. कार्टर हे १९७१ ते १९७५ या काळात जॉर्जियाचे गव्हर्नरही होते. (Jimmy Carter death)

जिमी कार्टर यांचे हरियाणातील एका गावाशी खास नाते

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर हे भारताला भेट देणारे तिसरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. कार्टर यांनी भारत दौऱ्यावर असताना तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यासोबत दिल्ली जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. या घोषणेने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा नवे पर्व सुरू झाले होते. भारत भेटीवर आले तेव्हा त्यांनी हरियाणातील एका गावालाही भेट दिली होती. ३ जानेवारी १९७८ रोजी कार्टर आणि तत्कालीन फर्स्ट लेडी रोझलिन कार्टर यांनी नवी दिल्लीपासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या गावाला भेट दिली. खरं तर, जिमी कार्टर यांची आई लिलियन १९६० च्या उत्तरार्धात पीस कॉर्प्समध्ये आरोग्य स्वयंसेवक म्हणून या गावात काम करत होत्या. जिमी कार्टर यांनी गावाला भेट दिल्यानंतर आणि त्यांचा गावाशी असलेला संबंध यामुळे गावातील लोकांनी कार्टर यांच्या सन्मानार्थ गावाचे नाव बदलून कार्टरपुरी ठेवले. (Jimmy Carter death)

कार्टर कल्याणकारी कामांसाठी प्रसिद्ध

अध्यक्षपद सोडल्यानंतर वर्षभरात त्यांनी 'कार्टर सेंटर' नावाची संस्था स्थापन केली. निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यात, मानवी हक्कांना पाठिंबा देण्यासाठी, आरोग्य सेवांना बळकट करण्यात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य त्यांना साथ देत नव्हते. २०१६ मध्ये कार्टर यांना स्टेज ४ कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र, कर्करोग होऊनही ते मानवतावादी कार्यात व्यस्त राहिले. (Jimmy Carter death)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT