Abraham Lincoln
अब्राहम लिंकन यांचा वितळलेला मेणाचा पुतळा.  X
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत उष्णतेची लाट! अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेत वाढत्या उष्म्याने लोक हैराण झाले आहेत. येथे तापमान एवढे वाढले आहे की यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा सहा फूट उंच उभा पुतळा वितळला आहे. वॉशिंग्टन डीसीमधील तापमानाचा पारा तिपटीने (फॅरेनहाइट) वाढला आहे. परिणामी, अब्राहम लिंकन यांच्या मेणाच्या पुतळ्याला या दुर्दैवी परिस्थितीचा सामना करावा लागला, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पुतळ्याची काय झाली अवस्था?

तीव्र उष्णतेमुळे पुतळ्याचे डोके वितळून वेगळे झाले आहे. तर एक पाय धडापासून वेगळा झालाय. पुतळ्याचा दुसरा पायही सोमवारी वितळला. यामुळे या पुतळ्याला आधार देणारी खुर्चीही जमिनीवर कोसळली. लिंकन मेमोरिअलमधील खराब झालेल्या या पुतळ्याच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, पुतळ्याचे डोके या आठवड्यात पुन्हा जोडले जाणार आहे, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

पुतळा वितळण्याची पहिलीच घटना नाही

CulturalDC या एनजीद्वारे सुरू केलेले हे स्मारक गॅरिसन एलिमेंटरी स्कूलच्या मैदानावर आहे. येथे पूर्वी गृहयुद्धाच्या काळात गुलाम आणि मुक्त केलेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांना आश्रय देणारे निर्वासित शिबिर होते. व्हर्जिनिया येथील कलाकार सँडी विल्यम्स आयव्ही यांनी तयार केलेला हा मेणाचा पुतळा द वॅक्स स्मारक मालिकेचा एक भाग आहे. हा पुतळा वितळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही येथील पुतळे वितळले होते.

'६० अंश सेल्सिअसपर्यंत वितळू शकत नाही, पण....'

विशेष म्हणजे, अब्राहम लिंकन यांचा पुतळा ६० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत वितळू शकत नव्हता, असे शिल्पकार सँडी विल्यम्स आयव्ही यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले. तर रिचमंड विद्यापीठातील कला शाखेचे हे साहाय्यक प्राध्यापक म्हणाले की, पुतळा तयार करण्यासाठी १४० डिग्री फॅरेनहाइट (६० अंश सेल्सिअस) पर्यंत टिकून राहण्यासाठी ग्रेड केलेले पॅराफिन मेण वापरले गेले होते.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

हा पुतळा गेल्या सप्टेंबरमध्ये त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आला होता. परंतु मेणाच्या स्मारकाच्या पहिल्या आवृत्तीमधील सुमारे १०० विक्स वितळले होते. त्याच्या समर्पण समारंभाच्या आधीच त्यांचा एक महत्त्वपूर्ण भाग वितळला होता. डीसी-मेट्रो परिसरात आठवडाभर उष्णतेच्या लाटेच्या इशारा देण्यात आला आहे. येथे आठवडाभर उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सोशल मीडिया यूजर्सनी हवामान बदलावर भाष्य म्हणून या पुतळ्याची छायाचित्रे वापरली आहेत.

SCROLL FOR NEXT