पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान. File Photo
आंतरराष्ट्रीय

Imran Khan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कारागृहात खून? पाकिस्तानमध्ये अफवांचे पीक

अदियाला कारागृहाबाहेर आंदोलन करणाऱ्या तिन्ही बहिणींनी केला पोलिसांनी मारहाण केल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Imran Khan health rumours viral : भ्रष्टाचार आणि अन्य अनेक प्रकरणांमध्ये गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट २०२३ पासून ते या तुरुंगात बंद आहेत. त्यांच्याविरोधात १५० हून अधिक फौजदारी खटले दाखल असून, त्यापैकी काहींमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. इम्रान खान यांच्याबाबत अनेक अफवा पसरल्या जात आहेत. 'अफगाण टाईम्स' (Afghan Times) नावाच्या हँडलने सूत्रांच्या हवाल्याने असा दावा केला की, रावळपिंडीतील अदियाला कारागृहात इम्रान खान यांची हत्‍या करण्‍यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही विश्वसनीय वृत्तसंस्था किंवा पाकिस्‍तानमधील सरकारी विभागाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अदियाला कारागृहाबाहेर आंदोलन करणाऱ्या इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना मारहाण झाल्याचेही वृत्त आहे. इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांच्‍याबाबत अफवांचे पीक

अदियाला कारागृहात इम्रान यांना विष देण्यात आले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दाव्याची पुष्टी झालेली नाही. पाकिस्तान सरकारने हे दावे पूर्णपणे अफवा असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचाही दावा केला जात आहे. 'द टेलिग्राफ'च्या अहवालानुसार, इम्रान खान व्हर्टिगो आणि टिनिटस सारख्या आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या वैद्यकीय अहवालात नमूद केल्यानुसार, त्यांच्या एका कानाची श्रवणशक्ती सतत कमी होत असून, त्यावर उपचार सुरू आहेत. आणखी एक अफवा अशी आहे की, आर्मी चीफ आसिम मुनीर आणि आयएसआयच्या इशाऱ्यावर तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली आहे. इम्रान खान यांना अनेक महिन्यांपासून कारागृहात एकांतवासात ठेवण्यात आले आहे.

नातेवाईकांना भेटण्‍याची परवानगी नाकारली

इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींचे म्हणणे आहे की, कोर्टाकडून परवानगी मिळूनही त्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून इम्रान खान यांना भेटू दिले जात नाहीये. पूर्वी जवळजवळ दर पंधरा दिवसांनी इम्रान यांना भेटणारे त्यांचे वकीलही तेच म्हणत आहेत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना इम्रान यांच्या तब्येतीबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाहीये, तसेच ते सध्या कुठे आहेत, हेही सांगितले जात नाहीये. इम्रान यांना गुपचूप दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले असल्याचीही चर्चा आहे.

पोलिसांनी मारहाण केल्‍याचा बहिणींचा आरोप

भाऊ इम्रान खान यांना तुरुंगात भेटण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या त्यांच्या तिन्ही बहिणी नोरीन, आलिमा आणि उज्मा खान यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे म्हणणे आहे की, पोलिसांनी बहिणींना मारहाण केली. आलिमा खान यांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु लवकरच त्यांची सुटका करण्यात आली. तत्‍पूर्वी, अदियाला कारागृहाबाहेर इम्रान खान समर्थक मोठ्या संख्‍येने जमा झाले. त्यांनी त्‍यांच्‍या प्रकृतीची माहिती देण्याची मागणी केली. दुसरीकडे, समर्थकांना आवरण्यासाठी आणि कोणतीही हिंसक घटना रोखण्यासाठी तुरुंगाबाहेर शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ इम्रान खान कारागृहात

इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात इम्रान यांनी त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासोबत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. ट्रस्टच्या नावाखाली रिअल इस्टेट टायकून मलिक रियाझ हुसैन यांच्याकडून ६० एकर जमीन दान घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, ज्यामुळे राज्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जानेवारी २०२५ मध्ये न्यायालयाने इम्रान खान यांना १४ वर्षांची, तर बुशरा यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय इम्रान खान यांच्यावर इतरही अनेक खटले सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT