को-पायलटनेच विमान कोसळवण्याचा केलेला प्रयत्न भारतीय कॅप्टनच्या प्रसंगावधनामुळे उधळला गेला होता. File Photo.
आंतरराष्ट्रीय

Flydubai Flight Emergency Landing : 'लढाऊ विमाने तातडीने रवाना करण्यात आली': 'फ्लायदुबई' घटनेबाबत इस्रायलचा धक्कादायक खुलासा

...तर पंतप्रधान नेतान्याहू यांना त्वरित निर्णय घ्यावा लागला असता

पुढारी वृत्तसेवा

Flydubai Flight Emergency Landing : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील सह-वैमानिकाने (को-पायलट) कथितरीत्या विमान पाडण्याचा प्रयत्न केला. आपत्कालीन संकेत (इमर्जन्सी सिग्नल) पाठवले. यावेळी इस्रायलने तातडीने लढाऊ विमाने रवाना केली, परंतु कोणतीही कारवाई करण्याची गरज भासली नाही, कारण प्रवासी आणि कर्मचारी यांनी विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवले. विमान सौदी अरेबियामध्ये सुरक्षितपणे उतरवले, असा खुलासा इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी केला आहे.

विमानाकडून आपत्कालीन संकेत

अझार यांनी वृत्तसंस्‍था 'पीटीआय'ला सांगितले की, "विमानाकडून आपत्कालीन संकेत मिळाल्यानंतर इस्रायलचे नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, हवाई दल आणि राजकीय नेतृत्व यांना त्वरित सतर्क करण्यात आले. इस्रायलचा भौगोलिक आकार लहान असल्याने, या परिस्थितीचे संभाव्य धोका म्हणून त्वरित मूल्यांकन करण्यात आले. लढाऊ विमाने तातडीने रवाना करण्यात आली, परंतु सुदैवाने, त्यांना कोणतीही कारवाई करावी लागली नाही."

... तर पंतप्रधान नेतान्याहू यांना त्वरित निर्णय घ्यावा लागला असता

इस्रायली राजदूतांनी स्पष्ट केले की, प्रवासी आणि कर्मचारी विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले असते, तर पंतप्रधान नेतान्याहू यांना त्वरित निर्णय घ्यावा लागला असता. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता; जर वैमानिक, कर्मचारी आणि प्रवासी विमान नियंत्रित करण्यात अपयशी ठरले असते, तर इस्रायलच्या पंतप्रधानांना त्वरित निर्णय घ्यावा लागला असता, ज्यावरून पुढील कारवाई निश्चित झाली असती."

नेमकी घटना काय आहे?

फ्लायदुबईच्या FZ1073 विमान १७४ प्रवाशांसह ( यामध्‍ये २७ मुलांचा समावेश होता) दुबईहून तेल अवीवकडे जात होते. सौदी अरेबियातील तबुक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअझीझ विमानतळाकडे वळण्यापूर्वी विमान वेगाने खाली आले होते. भारतीय कॅप्टन स्‍मिर मच्‍छार यांनी मोठी दुर्घटना टाळण्यास मदत केली.

भारतीय कॅप्‍टन स्‍मित मच्‍छार यांचे कौतुक

भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक करताना अझार म्हणाले, "सह-वैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतर, मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले, ज्यामुळे प्रवाशांना हस्तक्षेप करता आला आणि विमान कोसळण्यापासून वाचवता आले. मच्छार यांच्या या कृतीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग, संसदेचे अध्यक्ष आणि इस्रायलच्या जनतेने त्यांचे कौतुक केले आहे.

घटनेमागचा हेतू अस्पष्ट; तपास सुरू

राजदूतांनी नमूद केले की तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे आणि अधिकाऱ्यांनी या कथित हल्ल्यामागचा हेतू अद्याप निश्चित केलेला नाही.आम्ही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. मला वाटते की हल्लेखोराची चौकशी केल्यानंतर आम्हाला अधिक माहिती मिळेल." दरम्‍यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही म्हटले आहे की, या घटनेत इराणचा काही सहभाग होता का हे ठरवणे अद्याप घाईचे ठरेल. त्यांनी असे संकेत दिले की इस्रायल या तपासात सहभागी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT