Florida plane crash : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या या दुर्घटनेत नऊ जणांना घेऊन जाणारे एक खाजगी बिझनेस जेट निवासी परिसराजवळ कोसळले, ज्यामध्ये विमानात असलेले सर्व लोक ठार झाले. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी रविवारी या घटनेला दुजोरा दिला. हे विमान टेक्सासमधील ऑस्टिन येथून निघाले होते आणि बहामासच्या दिशेने जात होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, विमान कोसळण्यापूर्वी विमानातील एका महिला क्रू सदस्याने “अरे देवा, आपल्याकडील वेळ संपली आहे!” असा ट्रॅफिक कंट्रोलरला उद्देशून ओरडण्याचा आवाज ऐकू आला.
विमान हवेत असताना अचानक परिस्थिती वेगाने बिघडली. क्रू सदस्यांना ‘मे-डे’ (संकटाचा इशारा) कॉल करावा लागला.वैमानिक म्हणाला, “आम्ही खाली जात आहोत... मे-डे, मे-डे... आम्ही दर मिनिटाला १०,००० फूट वेगाने खाली जात आहोत.” आणखी एका अत्यंत अस्वस्थ संदेशात वैमानिकाने सांगितले, “विमानाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त (ओव्हरस्पीड) झाला आहे आणि आम्ही दर मिनिटाला २०,००० फूट वेगाने खाली कोसळत आहोत.आम्ही जमिनीवर आदळणार आहोत!” असे वैमानिक ओरडला, त्यानंतर एक किंकाळी ऐकू आली.
अपघातग्रस्त विमान 'लिअरजेट ६०' (Learjet 60) प्रकारचे होते. दक्षिण फ्लोरिडातील निवासी परिसरावरून जात असताना, हे विमान अचानक खाली कोसळले. एका रस्त्याजवळ मोठ्या स्फोटासह आदळले. या धडकेमुळे भीषण आग लागली. आकाशात आगीचा मोठा गोळा निर्माण झाला. विमान रस्त्याजवळ कोसळल्याने जमिनीवर एक खोल खड्डा पडला. अपघातस्थळी आगीच्या ज्वाळा आणि दाट काळा धूर पसरला होता.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान निवासी घरांच्या अत्यंत जवळ कोसळले. ते घरांपासून काही अंतरावर असलेल्या एका रस्त्यावर येऊन आदळले. घटनास्थळी उपस्थित लोक या घटनेने हादरले होते; त्यांनी सांगितले की, विमान घरांवर किंवा जवळून जाणाऱ्या वाहनांवर आदळण्यापासून थोडक्यात वाचले. आसपासच्या घरांचे काही नुकसान झाले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेच्या वेळी परिसरातून जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांनी विमान आकाशातून वेगाने खाली कोसळतानाचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्याजवळ आदळताच विमानातून आगीचा मोठा गोळा उसळला. अपघातस्थळी विमानाचे अवशेष आणि रस्त्याच्या खराब झालेल्या भागातून आगीच्या ज्वाळा सतत बाहेर पडत होत्या.